मन मानसी
देऊ मनाला उभारी..
गेल्या वर्षभरापासुन या कोरोना संकटाचा सामना प्रत्येक जण करत आहे, अनेक उद्योगधंदे , व्यवसाय व सर्व कामे ठप्प झाली आहे. अनेकांचे रोजगार गेले तर हातावर पोट असलेला कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.तर दुसरीकडे हलगर्जीपणा म्हणा किंवा तांत्रिक अडचणीमुळे प्राणवायुचा पुरवठा खंडीत झाल्याने अनेक निष्पाप जीव गेले आहेत, रुग्णालयातील एअर कंडीशनच्या बिघाडामुळे अनेकजण होरपळून निघाले..त्यांचे कुटुंब निष्कारण उघड्यावर पडले..खरचं अशा कुटुंबांना धीर देण्याची व मनाला उभारी देण्याची जास्त गरज आहे.
सध्याच्या परिस्थितीत चालू असलेल्या घटना वाचून व बघून मन हेलावून जात आहे. अशी कठीण परिस्थितीत याआधी अनुभवली नसल्यामुळे केवळ भीतीने अनेकांचे प्राण जात आहेत. यासाठी मनाला उभारी येण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते. ती घरातील सदस्यांनी, जवळच्या नातेवाईकाने देणे गरजेचे आहे.
जेष्ठांचे लसीकरण सुरक्षित करण्यासाठी घरातील मोठ्यांचा सहभाग आवश्यक आहेच..सध्या चाललेल्या या महाभयंकर संकटात बऱ्याच ठिकाणी प्राणवायू व इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे माणसांना जीव गमवावा लागत आहे, त्यासाठी लागणाऱ्या रक्ताची व प्लाझमाची गरज भासत असल्याने त्यासाठी सरकार व समाजातील अनेक संस्था मदतीला आहेतच.पण आपण म्हणजे घराघरांतून तरुण वर्गाने स्वतः हा सकारात्मक राहून हातभार लावला तर अनेक स्वकीय व इतरांचे आयुष्य वाचवू शकतो. एकमेकांना धीर देवून व नियमांचे पालन करुन..ही लढाई नक्कीच जिंकू या..आयुष्य समाधानाने, आनंदाने व्यतीत करू या…!
सौ. मानसी मंगेश जोशी.
खांदा कॉलनी.







Be First to Comment