कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ३.१४ लाखाहून अधिक रूग्ण आढळले तर २९०४ जणांचा बळी गेला. या महामारीला सुरूवात झाल्यापासून एखाद्या देशात इतक्या मोठया संख्येने नवीन रूग्ण सापडल्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून १,५९,३०,९६५ इतका झाला आहे तर मृतांचा आकडा १,८४,६५७ इतका झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी कोरोना रूग्णवाढीचा आलेख कायम राहिल्याने अॅक्टिव्ह रूग्णसंख्या वाढून २२,९१,४२८ इतकी झाली आहे. या वाढत्या रूग्णवाढीमुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. देशात सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने, राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे पण महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी गुरूवारी केली. यावरून हा प्रश्न खूप गंभीर असल्याचे लक्षात येते मात्र, देशातील उपलब्ध प्राणवायूच्या वितरणाचे योग्य नियोजन केले तर यावर सहज मात करता येवू शकते.
एकीकडे कोरोनामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या व श्वसनास त्रास होत असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा टंचाई निर्माण झाली असताना, देशातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असता देशात ऑक्सिजनचे उत्पादन हे मागणीपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र तरीही या ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी लागणारे क्रायोजनिक टँकर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने पुरवठयाची समस्या निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारने रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी उद्योगांना ऑक्सिजन पुरवठयावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता केवळ ९ अत्यावश्यक उद्योगांनाच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. भारतात मेडिकल ऑक्सिजनच उत्पादन करणा-या १०-१२ मोठया कंपन्या आहेत, तसेच ५०० पेक्षा अधिक छोटे गॅस प्लांट आहेत. गुजरातची आईनॉक्स एयर प्रॉडक्टस भारतात सर्वात मोठी ऑक्सिजन निर्माता आहे. यानंतर दिल्लीची गोयल एमजी गैसेस, कोलकत्ता येथील लिंडे इंडिया आणि चैनईची नेशनल ऑक्सिजन लिमिटेड यासुद्धा प्रमुख उत्पादक आहेत.रिलायन्स, टाटा स्टील, सेल, जिंदाल स्टील यांनी कोरोना रुग्णांवरिल उपचारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. इफ्को या खत बनवणा-या संस्थेने ऑक्सिजन प्लान्टची उभारणी सुरू केली आहे. येथून रुग्णालयांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तसेच मागणीची पूर्तता करण्यासाठी ५० हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाकाळापूर्वी देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची दररोज सरासरी ७०० मेट्रिक टन एवढी मागणी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ही मागणी २८०० मेट्रिक टन प्रतिदिन झाली. दुस-या लाटेमध्ये ही मागणी ५००० मेट्रिक टन पर्यंत पोहचली आहे. देशातील ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन मागणीपेक्षा अधिक आहे. १२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात दैनंदिन उत्पादन क्षमता ७ हजार २८७ मेट्रिक टन एवढी आहे. तर दैनंदिन मागणी ३ हजार ८४२ मेट्रिक टन एवढी आहे. ही मागणी ५००० मेट्रिक टन पर्यंत पोहचली तरी ती उत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. देशामध्ये सध्या मेडिकल आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा सध्याचा साठा हा ५० हजार मेट्रिक टन एवढा आहे. इंडस्ट्रियल ऑक्सिजनला मेडिकल ग्रेडमध्ये परिवर्तित करण्यासाठी तो ९३ टक्के शुद्ध करावा लागतो. मात्र त्यातील खरी समस्या ही या ऑक्सिजनला संबंधित रूग्णालयांपर्यंत पोहोचवण्याची आहे. लिक्विड ऑक्सिजन खूप ज्वलनशिल असतो. कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून याला क्रायोजनिक टँकर मार्फत एका ठिकाणाहुन दुस-या ठिकाणी पोहचविले जाते. सध्या देशामध्ये लिक्विड ऑक्सिजनची वाहतुक करण्यासाठी लागणारे क्रायोजनिक टँकर पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध नाहीत, आणि जे आहेत त्यांना ४० किमी प्रति तासापेक्षा अधिक वेग आणि रात्री १० वाजल्यानंतर चालवले जावू शकत नाही. यामुळे ऑक्सिजनची वाहतुक करून आवश्यक जागी पोहचविण्यासाठी खूप वेळ लागतो. सोबत सिलेंडर आणि त्यासोबत वापरण्यात येणा-या उपकरणांची टंचाई आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही.
सर्वात अधिक मेडिकल ऑक्सिजनची मागणी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब आणि राज्यस्थान या राज्यातुन होत आहे. मात्र प्रत्येक राज्यात ऑक्सिजन निर्मितीचा प्लान्ट नाही. दिल्ली आणि पंजाब मध्ये अधिकाधिक ऑक्सिजन हरियाणातुन येतो. उत्तराखंड राजस्थानला ऑक्सिजन देतो. गुजरात, छत्तीसगढ, आणि उत्तर प्रदेशातुन मध्यप्रदेशला ऑक्सिजन दिली जाते. अशा स्थितीत जेंव्हा ऑक्सिजन क्रायोजनिक टँकर मार्फत एका राज्यामधुन दुस-या राज्यात नेला जातो, तेंव्हा उत्पादक ते रुग्णाचे बेड पर्यंतचा याचा प्रवास कालावधी वाढुन ६ ते ८ दिवसापर्यंतचा होतो. एखादा ऑक्सिजन प्लान्ट सुरू करायचा असेल तर २४ महिने लागु शकतात. यासोबत लोक घेतलेले सिलेंडर वापस करत नाही आहेत. सरकार तर आपल्या वेगाने चालत आहे, मात्र ज्यांनी ऑक्सिजनचे खाली सिलेंडर ठेवून घेतले आहे ते त्यांनी परत केले तर या परिस्थितीला काही हद्दी पर्यंत सांभाळताही येईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेली मागणी रास्त आहे. केंद्राने ऑक्सिजनचे वितरण न्यायिक प्रमाणात केले पाहिजे. ज्या राज्यात रुग्ण संख्या अधिक त्या राज्याला इतर राज्यांच्या तुलनेने अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर भर दिला पाहिजे. देशात क्रायोजनिक टँकर, सिलेंडर आणि आवश्यक उपकरणात वाढ केली तर कुठेच प्राणवायूचा तुटवडा भासणार नाही. प्राणवायू न मिळाल्याने कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाला आपला जीव गमवावा लागणार नाही.
-सुरेश मंत्री.
संपर्क- ९४०३६५०७२२.
प्राणवायूचा तुटवडा
More from लेखMore posts in लेख »






Be First to Comment