Press "Enter" to skip to content

होळी

होळी

होळी रुसली यंदाची
म्हणे जाळू नका वृक्ष
मांडणी करा खड्ड्यांची
अन् लावा त्यात वृक्ष

गाडून अमंगळाला
पसरा त्यावर माती
होळीच्या नवरूपाला
सुंदर विचार गाती

खमंग पुरणपोळी
असू द्यावी नैवेद्याला
श्रीफळ दिव्यांच्या ओळी
उजळू दे आरतीला

घेऊन चैत्र दारात
पळस मोगरा बिट्टी
रानीवनी शिवारात
रंग उधळण्यासाठी

शाश्वत हा रंगोत्सव
निसर्ग दावितो ठायी
जीवसृष्टीचा उत्सव
नेत्र दीपवितो बाई

अगणित रंगछटा
भडक फिका गडद
पांघरती वृक्षलता
सुमन पाने विविध

रंगोत्सव चिरंतन
ओळखून तो जपूया
तरुवेली संवर्धन
सृष्टी रक्षिण्या झटुया

नवसंकल्प होळीचा
मिळुनी सारे करुया
झालेला ऱ्हास धरेचा
उपवनांनी भरुया

… स्वाती लेले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.