तमसो मा ज्योतिर्गमय्
आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरूंच्या तेजाची पूजा होते . आणि अमावस्येला दिव्यांची , ज्योतींची पूजा होते .
याबद्दल विचार करताना असं जाणवतं की , पौर्णिमेला दिव्यांची पूजा न करता अमावस्येला खास निमित्त ठेवले गेले . यामागचा हेतू सुद्धा नक्कीच उदात्त असला पाहिजे .
आणि मग लक्षात येतं , की दिवाळीत सुद्धा एक दिवस अमावस्येचा असतोच. खरंतर अंधार हा सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे पण अंधार हा आपला आधार होऊ शकत नाही तर प्रकाश हाच प्रगतीचा आत्मविश्वास असतो. आणि अंधारात प्रकाशाचं महत्त्व लक्षात यावं म्हणूनच अमावस्येचं प्रयोजन आपल्या परंपरेतूंन आलेलं असावं . कारण ,
प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा समंजसपणा आपली भारतीय संस्कृती आणि हे सणवार देत असतात .जी संस्कृती आजही हजारो वर्षानंतर एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असते. दीप अमावस्या याच मार्गातील एक भाग असावा.
रोज सकाळी देवघरांत उजळणारा आणि संध्याकाळी तुळशीजवळचा दिवा मांगल्याची प्रार्थना असतो. ” शुभं करोति कल्याणम् ” किंवा
“दिव्या दिव्या दीपत्कार” ही केवळ प्रार्थना नाही तर तो रोज होणारा शुभसंकल्प होतो .
कारण स्वतः जळणारा दिवा इतरांना प्रकाश देतो.
पूर्वीच्या काळातील प्रकाश दिवा, निरांजन , समई , ठाणवई , पणती , देवळा पुढच्या खांबाच्या उंचीएवढ्या दीपमाळा , किंवा मोठ्या देवळामध्ये रात्रंदिवस तेवणारे नंदादीप हे त्या काळातल्या पाऊलखुणा तर आहेतच , परंतु त्या दिव्यांनी एक दिव्य इतिहास निर्माण केला होता आणि ते सर्व त्या इतिहासाचे साक्षीदार होते .
अनेक ठिकाणी हमखास वापरला जाणारा लामण दिवा किंवा अनेक किल्ल्यांवर रात्रभर तेवणाऱ्या मशाली या फक्त उजेड देणाऱ्या किंवा केवळ अंधार दूर करणाऱ्या नव्हत्या. तर त्यावेळच्या वैभवाच्या , ज्ञानाच्या , पुरषार्थाच्या प्रतिक म्हणून गौरवल्या गेल्या होत्या .
नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी || संत नामदेव महाराजांच्या या ओळींचा अर्थ माझी आजी असा सांगायची की , पूर्वी मध्यरात्री पर्यंत , कंदीलाच्या उजेडात चालणारे प्रवचन , कीर्तन , भजन , याच दिव्यांच्या सहवासात गायचं आणि मनाच्या उजेडात परावर्तित व्हायचं !
इतका अगाध महिमा ज्या दिव्यांचा आहे त्यांच्या विषयी विनम्र भाव किंवा सर्व प्रकारचा अंधार दूर करून तेजाचं दान देण्याचं दातृत्व ज्यांच्या कडे आहे त्या दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार म्हणजेच दीप अमावस्या!
आपल्या ऋषींनी म्हंटलेलं आहे
‘ॐविश्वानिदेवसवितर्दुरितानी
परासुव।यद भद्रं तन्न आसुव॥’
प्रकाशाने उजळलेल्या सन्मार्गावर नेतृत्व करणाऱ्या ईश्वरा, सर्व प्रकारच्या दुष्टभावना आणि विचार दूर ने ,जे पवित्र आहे ते जवळ आण.
“तमसो मा ज्योतिर्गमय् ” अशी प्रार्थना जेव्हा केली जाते तेव्हा तेथे असलेला अज्ञान रूपी अंधःकार ज्ञानरूपी प्रकाशात नेण्याचा आपला प्रयत्न असतो.
दीप प्रार्थना
दीप सूर्याग्नि रूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् |
गृहाण मत्कृतां पूजां
सर्वकामप्रदो भव ||
(अर्थ– हे दीपा,तू सूर्यरुप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तर म तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.)
खरंतर श्रावण येण्यापूर्वी गटारी साजरी करायची की स्वतःला गिटार बनवायचं हे प्रत्येकाच्या संस्कारांवर अवलंबून आहे . आपण ज्या सद्य परिस्थितीच्या तिमिरात आहोत तेव्हा आज एक दिवा लावून तेजाकडे जाताना आनंदाचा , समाधानाचा , प्रकाश आपल्या प्रत्येकाच्या वाटेवर लवकरच दिसू दे अशी प्रार्थना सर्व प्राणीमात्रांसाठी करूया..
एक पणती एक ज्योत
प्रकाशाचं रूप असतं
अंधाराच्या आव्हानाला
तेवढं देखील खूप असतं
संगीता थोरात, नवीन पनलेल






Be First to Comment