Press "Enter" to skip to content

“ऑल इज रॉंग”चित्रपटाची शुटींग अंतिम टप्प्यात : काव्या कांबळे चमकणार

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

“ऑल इज रॉंग” हा आगामी हिंदी चित्रपट ही एक थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी “मर्डर मिस्ट्री” आहे. मनोरंजन, थरार आणि ग्लॅमरची मेजवानी असलेल्या या चित्रपटात उत्कंठावर्धक कथानकाचा खास तडका देण्यात आला आहे. तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन निर्मित करण्यात आलेल्या या चित्रपटातून महिला सक्षमीकरणाचा अनमोल संदेश देण्यात आला आहे.

आयुष्याच्या प्रत्येक पैलूत महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असतात हे सत्य या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे.या चित्रपटात रसायनी रिस येथील विक्रम कांबळे यांची कन्या काव्या कांबळे बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून काव्या मी मोहोपाडा रसायनी येथील एच ओसी पिल्लई स्कूलमध्ये पहिल्या वर्गांत आहे.

डीएम फिल्म्स आणि सॅम फिल्म्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक व्यक्तिरेखेत प्रेक्षक गुंतून राहावेत या दृष्टिकोनातून प्रत्येक दृश्याचे चित्रण करण्यात आले आहे. दत्ता मिरकुटे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. उत्तम पटकथा लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण २४ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. जून २०२१ मध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात दोन नायकांच्या प्रमुख भूमिका आहेत. निखिल सोनकेशरिया हा नायक अभिनेता, मॉडेल आणि व्यावसायिक आहे. निखिल हा भोपाळचा असून त्याला अभिनय क्षेत्राचा ७ वर्षांचा अनुभव आहे. टीव्ही मालिका, वेब सिरीज, लघुपट आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात त्याने काम केले आहे. “तारक मेहता का उलटा चष्मा” आणि सोनी वाहिनीवरील सीआयडी या मालिकांत तो झळकला आहे. राहुल भिसे या दुसऱ्या नायकाने प्रेम संकट (२०१६) या चित्रपटात काम केले आहे. मुस्कान लालवानी ही या चित्रपटात नायिकेची मध्यवर्ती भूमिका बजावीत आहे. ती रायपूर, छत्तीसगढ येथील असून भारती विद्यापीठ, पुणे येथे बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

“ऑल इस रॉंग” या चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये तरुण आणि उत्साही दिग्दर्शक, अभिनेते आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. अनिल मोहिते, सुशील चौकेकर, मध्य प्रदेशचा अयान शेख, सिद्धार्थ कांबळे, जळगावचा विशाल पाटील आणि आदर्श भट हे या चित्रपटातील अन्य कलाकार आहेत.

संपूर्ण चित्रपटात अवघे एक गाणे असून ते सुद्धा आयटम सॉंग आहे. मराठी चंदेरी श्रुष्टीतील आघाडीची तारका आणि “झी युवा अप्सरा आली” या रिऍलिटी शोची विजेती माधुरी पवारवर ते चित्रित करण्यात आले आहे.

“सरकारने चित्रपटगृहात आसनव्यवस्थेच्या १००% उपस्थितीस परवानगी दिली आहे. उत्तम, दर्जेदार आणि सकस चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे परतायचे आहे. “ऑल इज रॉंग” या तरुण वर्गाभोवती फिरणारा चित्रपट असून त्यातून एक मजबूत सामाजिक संदेश देण्यात आला आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, त्यांची करमणूक करील अशा दृष्टिकोनातून बनविण्यात आला आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता मीरकुटे यांनी सांगितले.

” भारताला स्त्रियांचा आदर आणि त्यांचा सन्मान करण्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती परंपरा कायम ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा हे या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे”, असे अभिनेते आणि चित्रपटाचे निर्माते अनिल मोहिते यांनी सांगितले.या चित्रपटात रसायनीतील बालकलाकार काव्या कांबळे चमकणार असल्याने तिचे सर्वंत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.