मोर्चा
मॉडर्न आयाबायांनो
विचारवंत थोरांनो
चला लवकर
ब्रेकिंग न्यूज आहे…
काय म्हणताय?
माहीत नाही?
अहो असं काय करताय?
ती बाई, तिला जाळल होतं ना?
हॉस्पिटल मध्ये गेली बिचारी…
आता आपल्याला तयारी करायला हवी
विषय पेटलाय,
आपली पोळी त्यावर
खरपूस भाजून घ्यायला हवी..
ओ विचारवंत,
जरा मोर्चाबिर्चाचे बघा
चारदोन ट्रक
माणसांची सोय करा.
खर्चाची काळजी नको
चॅनलवाले बघतील
चला चला लवकर
मेणबत्त्यांचा स्टॉक
असेलच मागच्या वेळचा
काढा तो बाहेर
चेहरे गंभीर करा
मेकप पण जरा
फेंटच करा
द्या पटापट बाईटस्
कॅमेरामन लक्ष दे
त्यांच्या अश्रूंना कर हायलाईट
चला चला
ब्रेकिंग न्यूज आहे
शिळी व्हायच्या आधी
आपल्या चॅनलवर
बातमी सतत
शिजवत ठेवा.
डॉ. समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment