Press "Enter" to skip to content

नवे युग नवे तंत्रज्ञान

नवे युग नवे तंत्रज्ञान

महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ उज्ज्वल शैक्षणिक योगदान देणारी ज्ञानदायी संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे २० वर्ग डिजिटल तंत्रज्ञानाने समृद्ध झालेआहेत, हा एक शुभ संकेतच आहे.
विद्यालयाला तंत्रस्नेही करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत ज्युपिटर डाय केम प्रा.लि.चे मॅनेजिंग पार्टनर मा. रमेश चोखानी, संचालक मा.एन् चेलप्पन यांनी CSR निधीतून ही तंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. तसेच हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मा.सुबोध भिडे आणि भारत विकास परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष, मा. गिरीश समुद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यालयात डिजिटल क्लासरूमची प्रत्यक्ष उभारणी करता आली आणि ही कार्यवाही करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेत विद्यालयाच्या शाळासमितीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, महामात्र मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी प्रोत्साहन देऊन वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. यासाठी आम्ही सर्व शिक्षक कृतज्ञ आहोत. पालकशिक्षकसंघानेही या विकास कार्याचे अभिनंदन केले. रायगड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी थोरात साहेबांनी दूरध्वनीवरून शुभेछा देऊन अभिनंदन केले . तसेच पनवेलमधील विद्यालयाच्या आधारस्तंभ मा. नीलाताई पटवर्धन यांनीही आपले शुभाशीर्वाद दूरध्वनीवरून दिले. मान्यवरांच्या शुभेच्छा आम्हास प्रेरणादायी आहेत. डिजिटल क्लासरूम च्या उध्दघाटन सोहळा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या सुप्रसन्न व प्रेरणादायी उपस्थितीत साजरा झाल्याने सर्वांचा आनंद शतगुणित झाला.
दसऱ्याच्या मंगलदिनी पाटीपूजन करून देवी सरस्वतीची आराधना करण्याची आपली परंपरा हे औचित्य साधत यावर्षी आपण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर डिजिटल क्लासरूममध्ये डिजिटल पाटीचे पूजन केले आहे . देवी अष्टभूजेच्या हातांमधील प्रत्येक आयुधाचा एक सांकेतिक,शुभंकर अर्थ आपल्या संस्कृतीने सांगितला आहे. या शारदोत्सवात देवीने आपल्याला नव्या युगाचे नवे टूल असे हे तंत्रज्ञान देऊन आशीर्वादच दिला आहे, अशी आमची धारणा आहे. अध्ययन, अध्यापन प्रक्रियेला रूढ चौकटीच्या पलीकडे नेणारे, ज्ञानाच्या नव्या क्षितिजाला गवसणी घालणारे हे नवे सीमोल्लंघन आपण केलेले आहे.
पनवेल परिसरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक हायटेक शाळा आहेत. आपले आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी विश्वाचे नेतृत्व करणारी, संस्कारित, विवेकी पिढी घडविण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकविण्याचे उत्तरदायित्व आता समाजाचेही आहे. हाच विचार आपल्यासारख्या सुहृदांच्या सहकार्याने पुढे नेत आपली मराठी माध्यमाची शाळा तंत्रस्नेही होत आहे हे पनवेलकरांसाठी खचितच अभिमानास्पद आहे.
कोविड १९ च्या भीषण संकटाशी सामना करताना ऑनलाईन टीचिंग करणे हे आम्हा शिक्षकांपुढे आव्हान होते. परंतु भविष्यकाळाचा वेध घेऊन परंपरा व नवतेचा मेळ घालणाऱ्या आमच्या संस्थेने एप्रिल व मे महिन्यात तंत्रस्नेही होण्यासाठी आम्हाला सुयोग्य प्रशिक्षण दिले आणि म्हणूनच आज या डिजिटल वर्गखोल्यांमधील प्रभावी अध्यापनासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत.
संस्थेच्या सर्वच शाळांमधून ‘राष्ट्रमन’ घडविण्याचे उज्ज्वल, उदात्त कार्य समर्पितवृत्तीने अखंडितपणे सुरु आहे. ज्ञानसाधनेतील भक्ती व तंत्रज्ञानाची शक्ती या दोन सुमनांनी मातृभूमीचे पूजन या ज्ञानमंदिरात करण्याचे व्रत या शारदोत्सवात आपण सारे घेत आहोत! धन्यवाद!

मानसी वैशंपायन

मुख्याध्यापिका,
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय न.पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.