Press "Enter" to skip to content

रा जी प शाळा जांभिवली वाडी येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने जांभिवली वाडी येथे मोठ्या उत्साहात सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मातांचा गुलाब पुष्प आणि छोटी भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे यथोचित संस्कारमय वातावरणात औक्षण करून पूजन केले. आईची महती सांगणाऱ्या प्रार्थनेचे विद्यार्थ्यांनी गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या उपशिक्षिका ज्योती किसन भोपी यांनी महिला दिन का साजरा केला जातो? त्याचे महत्त्व काय? हे उपस्थित मातांना विषद केले तर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश म्हात्रे यांनी कर्तुत्ववान महिलांच्या कार्याची ओळख व महती उपस्थितांना सांगितली.


विशेष म्हणजे महिला दिनासाठी उत्कर्ष महिला मंडळ करंजाडे च्या अध्यक्ष आशा केरेकर खजिनदार अर्चना रसाळ व सेक्रेटरी रेश्मा मोरे यांनी आवर्जून दिलेला केक सर्व महिलांच्या शुभहस्ते कापण्यात आला. या अनोख्या सन्मानाने सर्व महिला भारावून गेल्या होत्या. कार्यक्रम प्रसंगी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या वाडीवर पहिल्यांदाच होत असल्याबद्दल शाळेच्या दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुलींनी उत्तमरीत्या नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विजयी माता भगिनींचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थी व मातांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी जांभिवली वाडी गावच्या माजी सरपंच श्रीमती देवकी निकम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद्मा पवार,प्रेरणा संस्थेच्या जेनी मॅडम व रायकर मॅडम, अंगणवाडी सेविका अस्मिता कोंडीलकर, पोषण आहार ताई रेश्मा कोंडीलकर उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.