
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा अभूतपूर्व सन्मान
खोपोली पोलीस स्टेशन चा कारभार महिलांच्या हाती

खोपोली :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा अभूतपूर्व सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या नगरसेविका, डॉक्टर्स, परिचारिका, सामाजिक कार्यकर्त्या, महिला पोलीस कर्मचारी, महिला सफाई कामगार, महिला खेळाडू तसेच आदिवासी महिला भाजीविक्रेत्या अशा विविध स्तरातील महिलांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिव्यांग मुला-मुलींना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचे कौतुक करण्यात आले. छोटेखानी पण अत्यंत हृद्य अशा स्वागत आणि सन्मान सोहळ्याने उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची झलक दिसून आली.
महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्याकडे प्रतीकात्मक चार्ज सोपविण्यात आला आणि पोलीस स्टेशनमधील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी समर्थपणे सांभाळल्या. यासोबतच उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले की, नारी शक्ती ही समाजाची जननी आणि भगिनी या दोन्ही स्वरूपात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांचे स्थान अमूल्य आणि कायमस्वरूपी असते; मात्र जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. तसेच रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला खोपोली शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस स्टेशनमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्व महिलांचे सुहास्य वदनाने आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत होते. विशेषत: दिव्यांग मुला-मुलींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हा या कार्यक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला.
या उपक्रमामुळे खोपोली पोलीस स्टेशनने समाजातील नारी शक्तीप्रती आदर आणि कृतज्ञतेची सुंदर भावना व्यक्त करत महिला सन्मानाचा प्रेरणादायी संदेश दिला.




Be First to Comment