Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला महिला मुख्याध्यापिकांचा सत्कार

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल/ प्रतिनिधी :

पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत सजग संस्था म्हणून नावारूपास असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यामध्ये विद्यादान तसेच संस्था चालनाचे पवित्र कार्य करत असणाऱ्या महिला मुख्याध्यापिकांचा सन्मान केला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील व अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ८ मार्च रोजी पनवेलच्या शासकीय विश्रामगृहात हा सोहळा संपन्न झाला.


या सोहळ्यामध्ये डी एस पी शिक्षण संस्थेच्या सीनियर कॉलेजच्या प्राचार्या अस्मिता म्हात्रे (२०१६ सालचा शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त ), रायगड जिल्हा परिषदेच्या बामण डोंगरी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटील, गोखले एज्युकेशन सोसायटी खारघर च्या प्रचार्या डॉक्टर श्रुती निलेश काळे जाधव, अल्मा मॅटर पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रणाली पाटील, चिंचपाडा येथील न्यू इंग्लिश स्कूल ( इंग्रजी माध्यम)च्या मुख्याध्यापिका रुपाली मोरे, खारघरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आकांक्षा उपरेती, शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय कळंबोली येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श कार्यालयीन प्रमुख म्हणून दिपीका दीपक घोसाळकर तर आदर्श शिक्षिका निवेदिका म्हणून भारती धोंडे यांना सन्मानित करण्यात आले.
मंचाचे सल्लागार मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून संस्थेने जागतिक महिला दिनानिमित्त आजपर्यंत केलेल्या सत्कार सन्मानांचे विस्तृत विवेचन केले. त्यानंतर उपाध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त केले. अस्मिता म्हात्रे यांनी या सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे आभार मानले. भारती धोंडे आणि आकांक्षा उपरेती यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. यावेळी सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि छोटी भेटवस्तू देऊन आदर्श मुख्याध्यापिकांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सल्लागार माधव पाटील म्हणाले की आज अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या तुमच्यासारख्या भगिनींचा सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. खरे म्हणजे तुम्हाला सन्मानित करण्याचे सौभाग्य प्राप्त होणे हा खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेचा गौरव आहे. आम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना प्रत्यक्षात पाहू शकलो नाही, तसेच आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील पाहिलेले नाही, आम्ही जिजाऊ आऊसाहेबांना देखील पाहिलेले नाही परंतु या सगळ्यांची छबी आम्ही तुमच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांमध्ये नेहमीच पाहत असतो.
या सन्मान सोहळ्याला सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, उपसचिव राजू गाडे, सदस्य प्रवीण मोहोकर, लालचंद यादव, सुनील राठोड यांची सन्माननीय उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.