

माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धनासाठी एक धाव ; रायगड मॅरेथॉन पुरस्कार सोहळा उत्साहात
वेदा जनजागृती मंचाचे समाजकार्य उत्कृष्ट : पद्म श्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे प्रतिपादन
महाड : रघुनाथ भागवत
गेली 14 वर्षे अविरत माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये झोकून देऊन मानवसेवेचे सेवा कार्य वेदा जनजागृती मंच च्या वतीने उत्कृष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे पद्म श्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी वेदा जनजागृती मंचच्या आयोजित महिला दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक महाड शहरामध्ये रायगड मॅरेथॉन आणि समाजातील विविध गुणवंतांच्या पुरस्कार सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर महाड नगरीचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभाकर भुस्कुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, बाळ रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, वेदा जनजागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिगंबर गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गीते यांनी प्रास्ताविकमध्ये वेदा जनजागृती मंच ही एक अग्रगण्य संस्था असून जी अनेक वर्षे विविध क्षेत्रांमध्ये समाजप्रबोधन करत आहे. शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण, स्वच्छता, कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये ही संस्था प्रेरणादायी कार्यक्रम राबवत असून या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडले आहेत ज्यामुळे अनेक लोकांना नवीन दिशा आणि उत्साह मिळाला आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन व शिवजयंती निमित्त जाणता राजा, रायगड मॅरेथॉनचे विजेते व पुरस्कार विजेते यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आले ज्यामध्ये आदर्श शिक्षिका कलीमुनिस्सा वलिले, आदर्श पत्रकार नितेश लोखंडे, आदर्श माता पिता मेहबूब कडवेकर आणि सुरय्या कडवेकर, विजय चव्हाण आणि सुरेखा चव्हाण, शेखर म्हामुणकर आणि शालिनी म्हामुणकर, आरोग्य रत्न डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, आदर्श समाजसेवक सचिन बावलेकर, समाज गौरव पुरस्कार नथुराम निंबरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर रायगड मॅरेथॉन मध्ये वय वर्ष 10 ते 14 गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन करण्यात आला, तर 14 ते 16 वयोगट आणि 16 ते 45 आणि 45 ते 60 व 60 वरील ज्येष्ठ नागरिक यांनी देखील या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून विशेष कौतुक केले. डॉ. दिगंबर गीते यांनी वेदा जनजागृती मंच या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाबरोबरच समाज प्रबोधनाला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या समाजकार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
हिमालयातील बर्फ वितळणे आपल्यावर गंभीर परिणाम करत आहे. या कारणाने नद्या जसे की गंगा आणि ब्रह्मपुत्र यांचे स्त्रोत कमी होत आहेत ज्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. शेती, पाणीपुरवठा आणि जैविक विविधता यावर परिणाम होतो. देशातील अनेक लोकांचे जीवन, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. हे भयानक वास्तव मुख्यत्व: ग्लोबल वार्मिंगमुळे घडत आहे. ते रोखणे काळाची गरज असून त्यासाठी पर्यावरण संवर्धन हेच काळाची गरज असल्याचे डॉ. गीते यांनी यावेळी सांगितले.




Be First to Comment