जागर नवदुर्गेचा… माळ सातवी
*'कालरात्रि'*
सप्तम दिनी पूजावे सर्व सिद्धीदात्री, श्वासाग्नि, त्रिनेत्र, गर्दभारुढ असणाऱ्या कालरात्रि देवीस;
असे भयावह रूप असूनही हे शुभंकरी देवी, तू नित्य निर्भयता प्रदान करणारी आहेस निजभक्तांस…
दुर्गेचे सातवे शक्तीरूप हे कालरात्रि या नावाने ओळखले जाते. वाईट कालापासून रक्षण करणारी व रात्रीच्या अंधकारमय वाईट स्थितींचा विनाश करणारी ही शक्तीदेवता आहे म्हणून कालरात्रि असे नांव.
या देवीचे शरीर गडद काळ्या रंगाचे असून डोक्यावरील केस विखुरलेले व गळ्यात चमकणारी विद्युतमाला आहे. त्रिनेत्र असलेल्या या देवीचे तिन्ही नेत्र ब्रह्मांडासमान गोल आहेत. श्वासातून अग्नि निघणाऱ्या या देवीचे वाहन गाढव आहे. वर उचललेल्या उजव्या हाताची वरमुद्रा व त्याखालील हाताची अभयमुद्रा या भक्तांना नित्य निडरता, निर्भयता दर्शवणाऱ्या आहेत. तसेच डाव्या बाजूस वरच्या हातात लोखंडी काटा व खालच्या हातात तलवार आहे. भयानक रूप असूनही ही देवी शुभ फल देणारी अशी शुभंकरी आहे.
या दिवशी साधकाचे मन हे सहस्त्रार चक्रात स्थित होऊन यासाठी ब्रह्मांडातील सर्व सिद्धींचे द्वार उघडू लागतात. या देवीच्या नुसत्या नावाच्या उच्चारानेच सर्व असुरी शक्ती भयभीत होऊन दूर जातात. म्हणून तर सर्व ग्रह-बाधा, भूत-प्रेत, शत्रु, अग्नि, जल-जंतू, दैत्य-दानव हे सर्व भयावह त्रास या देवीच्या स्मरणमात्र नष्ट होतात व भक्तगण भयमुक्त होतात.
✍️ लेखिका✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.
Be First to Comment