
खालापूर एलसीबीच्या धडाकेबाज कारवाईत तिघे जेरबंद
खालापूर (प्रतिनिधी) : खालापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या टॉवर बॅटरी चोरीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेला सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पोही जप्त केला आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ व ८२/२०२६ असे दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. फुटेजमध्ये संशयास्पद वाहनाची हालचाल दिसून आल्याने त्या वाहनाचा माग काढण्यात आला. पुढील तपासात गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेऊन तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश मनोहर चव्हाण (वय २६, रा. गायकवाड पाडा, उल्हासनगर, ठाणे), रोहित मनोहर चव्हाण (वय २५, रा. गायकवाड पाडा, उल्हासनगर, ठाणे) आणि विजय सुरेश चव्हाण (वय २६, रा. साबाई नगर , ता. खालापूर) अशी आहेत. या तिघांकडून खालापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५८/२०२६ व ८२/२०२६ हे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेला सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहा फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार रणजित खराडे, शरद फरांदे, प्रतीक सावंत, रवी मुंडे तसेच पोलीस शिपाई प्रदीप खरात यांचा समावेश होता.
दरम्यान, परिसरात अशा प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




Be First to Comment