
भांडुप पूर्व – पश्चिम जोडणी सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प
मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील)
भांडुप पूर्व – पश्चिम जोडणी सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्गावरील उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रकल्प कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतिचा आढावा घेतला. तसेच, विविध निर्देश दिले.
हा नवीन उड्डाणपूल भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे. वीर सावरकर मार्गावर ज्या ठिकाणी पूल उतरत आहे, त्या ठिकाणी पूर्व – पश्चिम संरेखनाशी (Alignment) जोडणी होताना तीव्र वळण (Sharp Turn) आहे. उड्डाणपुलाचा आराखडा (Design) तांत्रिक मानकानुसार तयार करण्यात आला असला तरी पवई स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT) तज्ज्ञांकडून त्याची पडताळणी करावी. वाहतूक प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी वाहतूक अनुकरण अभ्यास (Traffic Simulation Study) करावा. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पुलाचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करून दिनांक ३१ जानेवारी २०२७ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. पादचारी रेल्वे प्रवासी, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी उड्डाणपुलावर सुगम्य पदपथ करावा, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
या पुलाची एकूण लांबी सुमारे ५३० मीटर राहणार असून रेल्वेवरचा भाग सुमारे ८९ मीटर इतका आहे. पुलासाठी एकूण १४ स्पॅन असून पूर्व बाजूस ७ तर पश्चिम बाजूस ५ आणि रेल्वेवर २ अशी विभागणी आहे. रस्त्याची रुंदी महानगरपालिका हद्दीत ११.५० मीटर आणि रेल्वे भागात १५.६० इतकी आहे. सध्या प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती साध्य झाली आहे. पश्चिमेकडील बाजूस खांब पाया बांधणी (Piling Work) व पाइल कॅपची कामे पूर्ण झाली आहेत. स्पॅन १ ते ४ दरम्यान तुळई उभारणीचे (Launching of Girder) काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पूर्वेकडील बाजूस खांब क्रमांक ६ व ७ साठी पाइलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. रेल्वेतील हद्दीत स्थापित करण्यात येणा-या पोलादी तुळ्यांची निर्मिती अंबाला येथे सुरू आहे. प्रमुख अभियंता (पूल) (अतिरिक्त कार्यभार) श्री.राजेश मुळे यांच्यासह अधिकारी, अभियंता, सल्लागार यावेळी उपस्थित होते.




Be First to Comment