Press "Enter" to skip to content

जागर नवदुर्गेचा…. माळ सहावी

माळ सहावी

‘कात्यायनी’

तेज:पुंज, सिंहारुढ तू चतुर्भुजाधारी हे कात्यायनी देवी, अमोघ फलदायिनी;
हे ब्रजमंडळाधिष्ठात्री, निजभक्तांसाठी तू सदैव धर्मार्थकाममोक्षदायिनी…

दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञा चक्रात स्थिर होऊन साधक कात्यायनी देवीच्या चरणी आपले सर्वस्व वाहतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपश्चर्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. व अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या घरी या भगवती रूपात जन्मलेल्या पुत्रीस कात्यायनी असे नाव दिले.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला. तेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांनी आपल्या तेजाच्या काही अंशाने एका देवीला या महिषासुराच्या विनाशासाठी उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली. सप्तमी, अष्टमी व नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.
या देवीचा गुण शोधकार्य आहे. म्हणून वैज्ञानिक युगात कात्यायनी देवीस सर्वाधिक महत्त्व आहे. ही वैद्यनाथ नावाच्या स्थानावर प्रकट होऊन तिची पूजा केली होती.
कात्यायनी देवी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रजगोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्री च्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनी चे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार व खालच्या हातात कमळाचे फूल असून तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनी देवीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम व मोक्ष या चार फलांची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो, तो रोग दुःख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

✍️ लेखिका✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.