Press "Enter" to skip to content

जागर नवदुर्गेचा… माळ तिसरी

जागर नवदुर्गेचा
माळ तिसरी

चंद्रघंटा

मस्तकी घंटाकार अर्धचंद्र, सिंहारूढ असलेल्या हे शांतीकल्याणकारी, तू स्वर्णकांतीने चमकतेस;
दशभुजास्त्रशस्त्रधारिणी हे देवी, तूच भक्तांस वीरता-निर्भयता, सौम्यता-विनम्रता प्रदान करतेस…

चंद्रघंटा देवीची उत्पत्ती ही वाईट-असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी झाली म्हणून या देवीचे हे स्वरूप अत्यंत शांतीदायक व कल्याणकारी मानले जाते. या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा देवी असे म्हणतात.
हिंदू धर्माप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक व घंटा ही आवाजाने वाईट शक्तींचा नाश करणारी अशी पावन मानली जाते. यामुळे नवरात्रातील तिसऱ्या दिवशी या देवीचे पूजन करून भक्त मनातील वाईट शक्तीरुपी कुविचारांचा नाश करून सौम्यता-विनम्रता या गुणांचा विकास प्राप्त करतो.
सोन्यासारखी कांती व दशभुजा असलेली ही देवी दहा हातांतील गदा, खड्ग, त्रिशूळ, धनुष्य, बाण, ज्ञानमुद्रा, अभयमुद्रा, कमंडलू, कमळ व जपमाळ या आयुधांनी शोभून दिसते. सिंहावर आरूढ झालेली तिची ही मुद्रा दैत्य-दानवांशी युद्ध करण्यासाठी सज्जता दर्शवते.
त्यामुळे या देवीच्या आराधनेने भक्त वीरता-निर्भयता ही प्राप्त करतो. या देवीच्या कृपेमुळे अलौकिक वस्तूंचे दर्शन, दिव्य सुगंध व विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येणे असे अनुभव येतात.
या दिवशी या देवीची आराधना केलेल्या साधकाचे मन ‘मणिपूर’ चक्रात प्रवेश करते, असे मानले जाते. तेव्हा मन, वचन, कर्म यांसहित शरीरास परिशुद्ध-पवित्र करून चंद्रघंटा देवीस शरणागत होऊन तिची उपासना-आराधना करावी. यामुळे सर्व कष्टांपासून मुक्तता मिळून परम पद प्राप्त होण्यास ही देवी कल्याणकारी ठरते.
✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.