‘शैलपुत्री’
वृषभारुढ,करत्रिशूळपद्मधारिणी शैलपुत्रीस;
मनोकामनापूर्तीसाठी प्रथम वंदावे या यशोदेस…
शैल म्हणजे पर्वत. शैलपुत्री ही हिमालय पर्वताची कन्या व भगवान शंकराची पत्नी आहे. यश देणाऱ्या या देवीचे वाहन वृषभ असून ही द्विभुजा आहे. या देवीच्या उपासनेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी देवी-उपासकांची श्रद्धा आहे.
एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष याने मोठा यज्ञ आयोजित केला. भगवान शंकराखेरीज सर्व देवदेवतांना त्याने निमंत्रण दिले. तेव्हा आपल्या वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञास जाण्यास उत्सुक झालेल्या सतीस, ‘निमंत्रणा विना तिथे जाणे योग्य नाही,’ असे शंकराने सांगितले. परंतु सतीने हे न ऐकता आग्रहपूर्वक भगवान शंकराकडून यज्ञास जाण्यास परवानगी मिळवली.
सती माहेरी आल्यावर आई व्यतिरिक्त बाकी वडील व बहिणींनी उपहास करून भगवान शंकराविषयी तिरस्कार व्यक्त केला व व वडील दक्षाने तर शंकरा विषयी अपमानास्पद शब्दही वापरले.
पती शंकराचा झालेला अपमान सहन न होऊन दुःखी झालेल्या सतीने स्वतःला योगाग्नीत जाळून भस्मसात केले.
या दारुण दुःखाने व्यथित होऊन शंकराने तांडव करत यज्ञाचा विध्वंस केला. त्यानंतर हीच सती शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली. म्हणून ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे. या जन्मात पुन्हा भगवान शंकराशी विवाह होऊन शैलपुत्री शंकराची अर्धांगिनी बनली.
या देवीचे महत्व व शक्ती अनंत आहे. हिला सती, पार्वती, वृषारूढा, हेमवती, भवानी या नावांनी ही संबोधिले जाते.
✍️ लेखिका✍️
श्वेता जोशी, नवीन पनवेल.
Be First to Comment