विणकर
पाचूहिरव्या पर्णामध्ये
अलगद झुलते मायाममता!
कुठला विणकर विण घालतो
गुंफून सुंदर नाजूक गवता!
नाही ऊंबरा,नाही चौकट
नसे तयाला एक गवाक्ष!
वात्सल्याचे इथे असे परी
तान्हूल्यांवर अचूक लक्ष!!
नाही तयावर नाव कोरले
कोण्या एका मालकाचे!
सुखे नांदते इथे औदार्य
कृपाळू विश्वचालकाचे!!
भार नव्हे ,भाग्यच मानुनी
सुखे मिरवी तया रोपटे!
वा-यासंगे झूलताना ते
शुद्धभाव हिंदोळा वाटे!!
खगानेही या नव्हे काही
नुसतेच आहे घरटे बांधले
एक एक काडी ती गुंफून
युगायुगांचे सुख सांधले!!
ऊडतील पिल्ले घरट्यामधूनी
पंखांमध्ये घेऊन शक्ती!
झेपावतील ती उंच नभावरी
ऊंबरठ्यावर ठेवून भक्ती!!
आरती सप्रे.ठाणे.






विणकर.. .एक धागा सुखाचा शंभर धागे.. या नंतर विणकर हीच मध्यवर्ती कल्पना तितक्याच समर्पकपणे सौ सप्रे यांनी सादर केली आहे.
काव्यांतील भावच नव्हे तर शब्द योजना आणि गेयता प्रवाही आहे.. अभिनंदन..