Press "Enter" to skip to content

“पढाई से दोस्ती” उन्हाळी शिबिर यशस्वीरित्या संपन्न


खांब (नंदकुमार मरवडे)

ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे व ग्लोबल इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,रोहा यांच्या स्थानिक सहकार्याने “पढाई से दोस्ती” हा उपक्रम रोहा तालुक्यात यशस्वीपणे राबवण्यात आला.

तालुक्यातील तळाघर, किल्ला,धाटाव, वरसे, सानेगाव या खेडे गावात “पढाई से दोस्ती” हा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राबविण्यात आला आहे . या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे, त्यांचे वाचन, लेखन, श्रवण आणि बोलण्याचे कौशल्य विकसित करणे हा आहे.

उपक्रमांतर्गत विविध मनोरंजक आणि शैक्षणिक कृती घेतल्या गेल्या. सुरुवातीला मुलांना खेळांच्या माध्यमातून एकत्र आणून शिकण्याची आवड निर्माण करण्यात आली. “खेळातून शिकूया” या पद्धतीने गटखेळ, शब्दखेळ, आणि विचार करायला लावणारे उपक्रम घेतले गेले. वाचन कौशल्य वाढवण्यासाठी रोज छोट्या-छोट्या गोष्टी, पाठ्यपुस्तकातील धडे आणि चित्रवाचन यांचा सराव करण्यात आला. मुलांनी ऐकून समजून घेण्याच्या (श्रवण) कौशल्यासाठी गोष्टी ऐकणे, त्यावर प्रश्नोत्तरे आणि चर्चा करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या आकलनशक्तीत वाढ झालेली दिसून येते .

लेखन आणि भाषिक कौशल्यांसाठी “शब्दफुलोरा” उपक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये मुलांनी दिलेल्या शब्दांवरून नवीन शब्द तयार केले. तसेच “वाक्य तयार करा” या कृतीतून मुलांनी योग्य वाक्यरचना करण्याचा सराव केला. विशेषण ओळखणे आणि त्यांचा योग्य वापर करणे या उपक्रमामुळे मुलांची भाषिक समज अधिक स्पष्ट झाली.याशिवाय, मुलांना स्वतः गोष्टी तयार करायला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला आणि आत्मविश्वास वाढला. गटचर्चा, सादरीकरण आणि सहभाग यामुळे मुलांमध्ये संवाद कौशल्यही विकसित झालेले दिसून आले.
एकूणच, “पढाई से दोस्ती” या उपक्रमामुळे मुलांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्यांचे वाचन, लेखन, श्रवण आणि बोलण्याच्या कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे पहावयास मिळाले.

या शिबिरासाठी वरसे ग्रामपंचायतचे सरपंच रामचंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच डॉ. स्वप्नाली पाटील,राजू कुलकर्णी आणि निलेश पडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पुण्यातील प्रख्यात ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे ओंकार बाणाईत, प्रकाश रणानवरे,अविनाश काठवटे,सुरेखा नाटेकर यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमात काही सत्र घेऊन खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमात श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा मधील सदस्य रिटा कशवालिया, प्रसाद भोईर, प्रसाद दगडे तसेच अंशुल कंपनीचे मॅनेजर किशोर तावडे यांचा सहभाग लाभला. विविध शाळांमधील शिक्षकांमध्ये विरजोलीचे अडसूळ सर, धाटावच्या मोरे मॅडम, उर्दू शाळेच्या शेख मॅडम , वरसे ज्येष्ठ अंगणवाडी शिक्षिका कांबळे मॅडम आणि पब्लिक स्कूलच्या पाटील मॅडम यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या शिबिरात वरसे, देवकान्हे, उडदवणे, मुठवली, तळाघर, किल्ला, वाशी, धाटाव आणि खैरवाडी येथील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराची सुरुवात प्रेरणादायी गीत व स्वागताने झाली. त्यानंतर संवाद कौशल्य, श्रवण कौशल्य, गणितीय खेळ, चित्रकला तसेच विविध कृती-आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

“खेळता खेळता शिकणे” या संकल्पनेवर आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना विशेष आवडले. गटांमध्ये काम करताना विद्यार्थ्यांमध्ये गटकार्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढल्याचे दिसून आले. ‘स्पर्शाने ओळख’, ‘कृती ओळखा’ आणि समस्या सोडवण्याचे खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक व स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून त्यांना अभ्यासाची गोडी लावली.

स्थानिक पालक गटातील महिला सदस्यांनी पुढाकार घेऊन मदत केली.
या शिबिराचे नियोजन शिक्षण मित्र पूजा जाधव, संपदा शिर्के, स्वप्नाली आकलेकर, तेजल नवशे आणि सानिका मोरे यांनी यशस्वीरित्या केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक व वैयक्तिक कौशल्यांचाही विकास झाला. शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले “असा उपक्रम पुन्हा आयोजित करावा” अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.