Press "Enter" to skip to content

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश

रोहा:समीर बामुगडे

भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे येथील विधी शाखेचा पदवीदान समारंभ जाहीर झाला असून, यात अ‍ॅड. अनिषा अनिल शिंदे यांनी एल.एल.एम. (LL.M.) या पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे त्यांचे रोहा तालुक्यात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
अनिषा शिंदे यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्य राखत विधी क्षेत्रात हे विशेष प्राविण्य मिळवले आहे. कठीण परिश्रम, विषयाचे सखोल ज्ञान आणि अभ्यासातील चिकाटीच्या जोरावर त्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान मिळवले. भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मा.प्रतापराव जाधव आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्या हस्ते त्यांना हे सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.

आपल्या यशाबद्दल बोलताना अनिषा यांनी सांगितले की, “नियोजित अभ्यास आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच मी हे यश संपादन करू शकले. कायद्याचा अभ्यास केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी न करता, त्याचा समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कसा वापर करता येईल, यावर माझा भर असेल.”

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांच्या या यशाबद्दल विधी क्षेत्रातील दिग्गज, त्यांचे मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. एक तरुण आणि अभ्यासू वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महिला वकिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात विधी क्षेत्रात संशोधन आणि वकिली व्यवसायाद्वारे न्यायदान प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.