गावस्करचा पण असाच एक भारी किस्सा आहे. त्यावेळी वेस्ट इंडिजचा फास्ट बोलर माल्कम मार्शल फुल फॉर्म मध्ये होता. आणि गावस्कर आणि अजून आपला दुसरा कोणी तरी गंप्या प्लेयर ब्याटिंग करत होते. गंप्या जबरदस्त टरकला होता कारण मार्शल खूप बौन्सर्स टाकत होता. तो गावस्करला म्हणला की बाकीच्या बोलींगचे ठीक आहे (!) पण त्याचा बाऊन्सर आला की माझी तंतरते. गावस्करने त्याला सांगीतले की मार्शलने रनअप स्टार्ट केला कि बॉल माझ्या हाताकडे बघ. मी काहीतरी खूण करेन, तो बाउन्सर असेल तर. आणि खरोखरच गावस्करने गंप्याला सगळे बाऊन्सर आधी सांगितले. ही गोष्ट सिरीज संपल्यावर गंप्याने मार्शललाच सांगितली तर तो पार कोसळलाच.
आणि त्याने गावस्करला विचारले कि तुला कसे बरोबर समजायचे कि मी कोणता बाऊन्सर टाकणार आहे ते. गावस्कर हसत त्याला म्हणला “सोपे आहे ते. तू दर वेळी जेव्हा रन अप घ्यायला जायचा तेव्हा मी तुझ्याकडे नीट बघायचो. आणि माझ्या असे लक्षात आले कि तू ज्या बॉलला बाऊन्सर टाकायचास , त्या बॉलचा रनअप चालू करताना तू तुझी पॅन्ट सावरायचास 😀😀😀
एकदा गावस्कर समालोचन करत होता. कोर्टनी वॉल्श बोलींग करत होता. आणि गावस्करने सहज सांगितले की पुढचा बॉल “स्लोअर वन” असेल आणि तो खरंच स्लोअर वन होता. म्हणून सहसमालोचकाने विचारले की तुम्ही हे कसे सांगू शकलात? तेव्हा गावस्करने सांगितले कि मी वॉल्शच्या मागच्या 3 4 ओव्हर्सला नोट केलंय कि त्याच्या ओव्हरचा पाचवा बॉल तो स्लोअर वन टाकतो.
म्हणजे समालोचन करताना त्याचे लोचन एवढ्या बारीक गोष्टी टिपत असतील तर तो खेळत असताना काय विलक्षण एकाग्रता आणि जागरूकता असेल. 🙏🏻
बेन्सन हेजेस वर्ल्ड कप फायनल – 1985. भारत विरुद्ध पाकिस्तान.
पहिली ब्याटिंग पाकिस्तानची होती आणि त्यांच्या 9 विकेटस लवकर पडल्या होत्या आणि फक्त 40 वगैरेच ओव्हर्स झाल्या होत्या. आणि पुढचा बोलर, रवी शास्त्री नवीन ओव्हर टाकायला रनअप घ्यायच्या तयारीत असताना, गावस्करने त्याला एकदम थांबवले ( तो बोलींग चांगली टाकत होता त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले ). आणि चेतन शर्मा, जो एकदम डीपला फिलडींग करत होता त्याला बोलींग टाकायला बोलावले. पण चेतन क्रीजपाशी पोचल्यावर परत विचार बदलला असे दाखवून त्याला परत पाठवून शास्त्रीला बोलींग दिली.
ओव्हर संपली तेव्हा अंपायर टोनी क्राफ्टरने घडाळ्यात पाहिले आणि तो गावस्करला म्हणाला “Aha, Now I know why you played that charade”.
ती ओव्हर चालू होण्यापूर्वी 5.30 ला दोन मिनिटे राहिली होती. आणि जर पाकिस्तान 5.30 च्या आधी ऑल आउट झाले असते तर आपल्याला ब्रेक टाईमआधी वीस मिनीटे तरी खेळायला लागले असते….विलक्षण चातुर्य 🙏🏻
आता थोडा मजेशीर किस्सा. सनी डेज मध्ये गावस्करचा एक फोटो आहे त्यात तो एक जबरदस्त शॉट मारताना दाखवला आहे पण त्याची ट्राउजर मांडीपाशी फाटली आहे. मला नेहेमी आश्चर्य वाटायचे कि हा फोटो कशाला? पण काही वर्षांपूर्वी युट्युबवर जोनाथन अँगन्यूने त्याची घेतलेली मुलाखत मी बघत होतो आणि त्यात त्याने गावस्करला त्याबद्दलच नेमके विचारले. गावस्कर म्हणला की “हो, मी ओल्ड ट्रेफर्डला ब्याटिंग करत होतो तेव्हा ट्राउजर मांडीपाशी फाटली. म्हणून मी टी टाईम ला ड्रेसिंगरूममध्ये गेलो होतो तेव्हा ट्राउजर बदलायला लागलो. तेव्हा कँप्टन अजित वाडेकरने मला थांबविले आणि सांगितले की “Nothing doing, you are not going to change your luck. You will continue batting wearing the same trouser”.
कॅप्टनचीच आज्ञा म्हणल्यावर काय करणार. मग गावस्कर जेव्हा परत ब्याटिंगला गेला तेव्हा टोनी ग्रेग सिली पॉईंटला फिल्डिंग करत होता, त्याने टोमणा मारला “Hey, I see you like Airconditioning!!”..
…
संकलन सहाय्य
शामनाथ पुंडे
पनवेल.
Be First to Comment