Press "Enter" to skip to content

भारतीय वायुसेना चिरायू होवो…

पराक्रमाची आणि  उज्ज्वल कामगिरीची परंपरा जपलेल्या भारतीय वायुसेनेने आज ही आपली ओळख कायम ठेवली आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक यंत्रणेसह वायुदल अधिक सक्षम होत आहे.
‘ज्या देशाची वायुसेना सक्षम, तो देश मजबूत’, असे आंतरराष्ट्रीय पातळीवर समीकरण आहे. ऑक्टोबर १९३२ साली ब्रिटिश ओक्झिलरी एअरफोर्स म्हणून वायूसेनेची स्थापना झाली. सध्या आपला देश या बाबतीत स्वयंपूर्ण असला तरी अजूनही त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
दुसऱ्या महायुद्धात सुरवातीला १९४२ मध्ये इंग्लड आणि जर्मनीने विमानांचा वापर करून साऱ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली. त्यावेळी लोकांना विमानदलाचे महत्व समजले. त्यानंतर जगभरातील देशांनी आपआपले वायुदल  अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली. प्रारंभी चार वेस्ट लँड ट्रेनी ऑफिसर, १९ हवाई शिपाई, त्यांचे कमांडर फ्लाईट लेफ्टनंट, सेसिल ब्राउचर या स्कॉड्रनचे अधिकारी यांच्या समावेशाने भारतीय वायुसेनेला सुरवात झाली. गेल्या ८८ वर्षाच्या प्रवासात भारतीय वायुसेनेने पृथ्वी, अग्नी यासारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच १९४५ साली ‘रॉयल’ एअरफोर्सने ओळख निर्माण केली. त्यानंतर १ एप्रिल १९५४ मध्ये एअर मार्शल सुब्रातो मुखर्जी पहिले भारतीय एअरफोर्स चीफ झाले. स्वातंत्र्यानंतर वायुसेनेने चीन (१९६२), पाकिस्तान बरोबर (१९६५, १९७१) झालेल्या युद्धात उत्तम कामगिरी केली. त्यानंतर कारगिल संघर्षात भारतीय वायुसेनेने अतुलनीय कामगिरी केली. याशिवाय ऑपरेशन ‘विजय’, ‘मेघदूत’, ‘केक्ट्स’ यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. एअर मार्शल अर्जुन सिंग यांना एअर चीफ मार्शल म्हणून बढती देण्यात आली. पाच स्टार सांभाळणारे भारतीय सेनेतील ते पहिले अधिकारी ठरले. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत ही उत्तम कामगिरी केली. अगदी अलीकडच्या काळात वायुसेनेने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करून आपला दबदबा निर्माण केला. यावेळी तर भारताचे विंग कमांडर अभिनंदन शत्रू राष्ट्राच्या ताब्यात सापडले. पण त्यांनी त्रास देऊनही आपल्या देशाची गुपिते शत्रू राष्ट्राला सांगितली नाहीत.
चीनशी १९६२ मध्ये झालेल्या युद्धात भारताने वायू दलाचा म्हणावा इतका वापर केला नाही. अरुणाचलच्या डोंगराळ भागात शत्रू सैन्याला खिंडीत गाठून त्यांना जेरीस आणता आले असते. मात्र विमानांचा वापर केला नाही किंबहुना वायू दलाशी चर्चाही केली नाही. परिणामी पदरात नामुष्की पत्करावी लागली. असे मत तत्कालीन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय वायुसेनेतील अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून युद्धनीती आखली. त्यामुळे सरकारचे पाठबळ व नियोजन भारताने यश संपादन केले. बांगला देश स्वतंत्र करण्यात भारताची महत्वाची भूमिका होती. कारगिल युद्धात वायुसेनेने केलेल्या कामगिरीमुळे वायुसेनेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
सप्टेंबर २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरच्या महापुरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अशा अस्मानी संकटात वायुसेना आणि सैन्य दलाने देवदूतासारखे धावत जाऊन लोकांना प्रतिकूल परिस्थितीत केलेली मदत कौतुकास्पद होती. भारतीय सैन्य दल आणि वायू दलाने केलेली मदत साऱ्या जगाने पहिली. अवर्णनीय व अतुलनीय कामगिरी बद्दल त्यांच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला. २०१८ मध्ये केरळला महापुरात वायू दलाचे काम महान असेच होते.
शेजारच्या पाकिस्तान आणि चीनने आपले हवाई दल जलद गतीने सुसज्ज केले आहे. त्या तुलनेत भारतीय वायू दलात अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. अत्याधुनिक विमानांचा आणि अन्य अत्यावश्यक सामग्रीचा समावेश करायला हवा. भारतीय वायू दलाने काही उद्दीष्ठे डोळ्यासमोर ठेवली आहेत. संरक्षण दलासाठीची अर्थ संकल्पातील तूटपुंजी तरतूद, खरेदीची किचकट प्रक्रिया, देशांतर्गत उत्पादनामध्ये अत्यल्प सुधारणा, उच्चस्तरीय संरक्षण व्यवस्थेची कमतरता आदी अडचणींचा सामना वायू दलाला करावा लागत आहे. भविष्याचा वेध घ्यायचा झाल्यास सद्यस्थितीत भारतीय वायू दलासमोर मोठी आव्हाने आहेत. शेजारील राष्ट्रांची चाल लक्षात घेता त्यांच्या वर्चस्वाला सहज शह देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. चीन आणि पाकिस्तानचे प्रादेशिक हवाई वर्चस्व रोखण्यासाठी संख्याबळ आणि लढाऊदृष्ट्या बळ वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे ठरण्याची शक्यता आहे.
येणारा काळ हा संघर्षाचा असणार आहे. सद्यस्थितीत देशाच्या उत्तर सीमेवर सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता काळाची पावले ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य द्यायला हवे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊनही वायू दलात ‘राफेल’ विमानांचे झालेले आगमन जमेची बाजू ठरणार आहे. वायू दलात महिलांचा समावेश ही देखील समाधानाची बाब म्हणावी लागेल. राफेलची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान फ्लाईट लेफ्टनंट सिंह यांनी पटकावला हेही गौरवशाली आहे.
शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारे देशाचे वायुदल अधिकाधिक सक्षम होऊन जगभरात नावलौकिक वाढत राहो, हीच वायू दलाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा.
   श्री मुरलीधर देसाई, माजी वायू सैनिक, कोल्हापूर.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.