आयपीएल 2020 च्या 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. या मोसमातील चेन्नईचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी चेन्नईला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तीन पराभवानंतर व्हिसल पोडू असे म्हणणाऱ्या चेन्नई ची शिट्टी वाजली.या सामन्यात प्रथम खेळत पंजाबने 20 षटकांत चार गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने कोणताही गडी न गमावता 17.4 षटकांत लक्ष्य गाठलं आहे.
पंजाबच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनने तुफान फटकेबाजी करत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. वॉटसनने 53 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या.
तर प्लेसिसने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 87 धावा फटकावल्या. या मोसमातील वॉटसनचे हे पहिले अर्धशतक आहे.
तत्पूर्वी, चेन्नईविरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने 20 षटकात 178 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 8.1 षटकांत 61 धावांची भागीदारी केली. मात्र, मयंक अग्रवाल 26 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंग देखील 27 धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब 200 पार पोहोचणार असं वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात परत आणलं. के एल राहुलने 52 चेंडूत 63 तर निकोलस पुरन याने 17 चेंडूत 3 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 33 धावा धावसंख्येत जोडली.
ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही. मॅक्सवेलच्या नाबाद 11 आणि सर्फराजच्या नाबाद 14 धावांच्या जोरावर पंजाबला 178 धावांपर्यंतच मजला मारता आली. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर रवींद्र जडेजा आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मुंबई ची पोरं हुश्यार….
हैदराबाद ला सहज नमवले
शारजाह : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रविवारी विजयी परंपरा कायम राखली. शारजाह मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबाद संघ ७ बाद १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत अपयशी झुंज दिली. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही.
जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची आश्वासक सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले.
यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असे वाटत असतानाच मनीष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबादच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विलियम्सन आणि प्रियम गर्ग लवकर माघारी फिरले. वॉर्नरने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.
त्याआधी, क्विंटन डीकॉकची अर्धशतकी फटकेबाजी आणि डेथ ओव्हरमध्ये पोलार्ड व पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत चांगला मारा केला. परंतु अखेरच्या षटकांत मुंबईच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. डीकॉकच्या ६७ धावा हे मुंबईच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
डिकॉकची अर्धशतकी खेळी, कुणाल पांड्याच्या ४ चेंडूंतील २० धावा.
शारजाहच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा. फलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी दिली नाही.
कृणाल पांड्याने सनरायजर्सविरुद्ध रविवारी चार चेंडूत २० धावा ठोकल्या. २९ वर्षांच्या कुणालने ५०० च्या सर्वोच्च ‘स्ट्राईक रेट’ने या धावा करताना सिद्धार्थ कौलच्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार मारले.
आयपीएलमध्ये हा विक्रम ठरला आहे. ईशान किशन-डिकॉक जोडीने महत्त्वपूर्ण ७८ धावांची भागीदारी केली.
Be First to Comment