खाजगी डॉक्टर्संना देखील विमा संरक्षणकवच द्या : आ. जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । अमोल नाईक ।
शासकीय डॉक्टर्सप्रमाणेच खाजगी डॉक्टर्स देखील कोव्हीडमध्ये काम करीत असतानाच मोठया प्रमाणावर खाजगी डाक्टर्सना होणारी कोव्हीडची बाधा पाहता शासकीय डॉक्टर्सप्रमाणेच सर्व क्षेत्रातील खाजगी डॉक्टर्सनादेखील विम्याचे संरक्षण कवच मिळावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने धोरण ठरवावे अशी मागणी शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
आ. जयंत पाटील यांनी याबाबत शासनाकडे आजच पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार त्यांनी म्हटले आहे की, कोव्हीडमध्ये काम करणार्या शासकीय डॉक्टर्सना विम्याचे संरक्षण शासनाने दिलेले आहे. त्याचपद्धतीचे विमा संरक्षण खाजगी प्रॅक्टीस करणार्या डॉक्टर्सना देखील दिले पाहिजेत. या विम्याचा हप्ता खाजगी डॉक्टरांनी उतरविला तरी या ठिकाणी त्यांना मोठे संरक्षण मिळू शकेल. जे वैद्यकिय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स आहेत मग आयुर्वेदिक असो, होमिओपॅथी असो वा अॅलोपॅथी या सर्व डॉक्टर्सना हे विम्याचे संरक्षण कवच मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी केली आहे. आपण याबाबत आज राज्यशासनाला पत्र दिलेेले असून त्याचा पाठपुरावाही निश्चितपणे करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिलेली.
आज कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर होत आहे, त्यामुळे खाजगी डॉक्टर्सकडे जाणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र खाजगी डॉक्टर्संना विम्याचे संरक्षण कवच नाही. या डॉक्टरांच्या संरक्षणासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष तरतूदी केंद्र तसेच राज्यशासनाने केल्या पाहिजेत. जेणे करुन डॉक्टर्संना विशेष करुन ग्रामीण भागात काम करणार्या डॉक्टरांच्या मनामधील भीतीचे वातावरण कमी होईल. ग्रामीण भागातील सर्व डॉक्टर्स या काळात व्यवस्थितपणे काम करीत आहेत. हे काम करीत असताना त्यांच्याकडे जो कोव्हिडचा रुग्ण येतो त्याच्या संसर्गामुळे या डॉक्टर्संना देखील कोव्हीडची बाधा होण्याचा जास्त धोका आहे. हे प्रमाण वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील खाजगी डॉक्टर्संना विम्याचे संरक्षण कवच मिळाले पाहिजे यासाठी केंद्र तसेच राज्यशासनाने धोरण ठरविण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.
Be First to Comment