ग्राऊंड झिरोवर उतरून जिल्हाधिकारी निधी चौधरी मैदानात 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔷🔶🔶🔷
कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून देश व राज्यात देखील कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या व मृत्यूमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असून हे रोखण्यासाठी राज्यसरकाने यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मानतर्फे झिराड आणि चेंढरे या गावात स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी तसेच शरीर तापमान मोजण्यात आले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत शहर,गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जात आहे. या मोहिमेची पहिली फेरी दि.15 सप्टेंबर 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 अशा टप्प्यात होत आहे.
या मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या (co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, SARI/ ILI रुग्णांच्या भेटीद्वारे सर्वेक्षण करणे,त्यांची कोविड-19 तपासणी आणि उपचार तसेच गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकाला कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
हे पथक गावोगावी, असंख्य आदिवासी वाड्या पाड्यात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण पथक कोव्हिडं योध्याची महत्वपूर्ण भूमिका चोख बजावताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सदर मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून या मोहिमेसाठी 1 हजार 500 पथके तयार करण्यात आलेली आहेत. गृहभेटीच्या वेळी येणाऱ्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करून त्यांच्या घरातील सदस्यांची आरोग्य विषयक खरी माहिती द्यावी व आपली आरोग्य विषयक तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आवाहनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
त्यांच्यासमवेत तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दीप्ती पाटील-देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे, मंडळ अधिकारी जितेंद्र कांबळे ग्रामसेवक सुदेश राऊत, निलेश गावंड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे, वरिष्ठ सहाय्यक देवेंद्र झेंडेकर, ग्रामसेवक प्रशासक अपर्णा शिंदे, आरोग्य सहाय्यक उदय गाडे, आशाताई ,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांची उपस्थिती होती.
Be First to Comment