सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली : 🔶🔷🔶🔷
देशातील कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढत आहे. दररोज ९० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येचा विचार करता भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष कोरोना लसीकडे लागलं आहे. दरम्यान भारतीय तज्ज्ञांनी याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे.
कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले असू.म्हणजेच पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत कोरोना व्हायरसंच संकट कमी होईल. जनजीवन सुरळीत होईल असा दावा एम्सच्या तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी असं मत व्यक्त केलं आहे. वृत्तसंस्था एएनआयनं यासंबंधी ट्विट केलं आहे.
यावेळी डॉ. संजय राय म्हणाले की, “भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लसींपैकी कोणतीही कोरोना लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. पण लस नाही आली तरीसुद्धा पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण जोपर्यंत कोरोनाविरोधात प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.”
पुढील वर्षी उपलब्ध होईल कोरोना लस, पण… आरोग्यमंत्र्यांनी सांगितली सर्वात मोठी अडचण
कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल, अशी माहिती हर्षवर्धन यांनी संसदेत दिली. मात्र ती सर्वांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, असंही ते पुढे म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढाईत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितलं. यावेळी विरोधकांनी कोरोना लसीच्या उपलब्धतेसोबतच तिच्या किमतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्यापूर्वीच संकटाचा सामना करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. ‘८ जानेवारीला कोरोना संकटाबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यानंतर १७ जानेवारीला आरोग्य व्यवस्था सज्ज ठेण्यास सुरुवात करण्यात आली. नियमावली जारी केली गेली. यानंतर २० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. तो चीनमधून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १६२ जणांचा शोध घेण्यात आला,’ असा तपशील आरोग्यमंत्र्यांनी दिला.
‘कोरोना संकटाचा सामना करताना देशात पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि मास्कचा तुटवडा जाणवेल, असं अनेकजण म्हणत होते. वृत्तवाहिन्यांवर डिबेट सुरू होत्या. मात्र आपण या लढाईत फार वेगानं पुढे सरकलो. सध्याच्या घडीला देशात शेकडो कोरोना तपासणी केंद्रं आहे. केंद्र सरकारनं कोणताही भेदभाव न करता सर्व राज्यांना योग्य मदत आणि सहकार्य केलं आहे,’ असं हर्षवर्धन यांनी सभागृहाला सांगितलं.
Be First to Comment