सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेकजण विनामास्क बाजारात फिरत असतात. आज अशा विनामास्क फिरणाऱ्या विरोधात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी मोहीम उघडली. शहरात विनामास्क फिरत असणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई म्हणून ५०० रुपयांची पावती फाडली जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरण परिसरात ही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. त्याला आळा बसावा म्हणून मास्क लावणे, सोशल डिस्टंट पाळणे याचे पालन होत नसल्याने कोरोना वाढत आहे. उरण शहरातही नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
त्याला रोखण्यासाठी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून उरण कोटनाका येथील मासळी मार्केट पासून स्वतः मुख्याधिकारी माळी यांनी जातीने हजर राहून विनामास्क फिरताना आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपयांची दंडात्मक पावती फाडली जात आहे .
मुख्याधिकारी माळी यांनी विनामास्क फिरणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केल्याने विनामास्क फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर या मोहिमेमुळे नगरपालिकेच्या या कारवाईचे स्वागत करून कमीत कमी शहरात तरी आता मास्क न लावता फिरण्याचे प्रमाण कमी होईल असा विश्वास जनतेकडून व्यक्त होत आहे.
Be First to Comment