Press "Enter" to skip to content

सप्टेंबर व ऑक्टोबर महिना ठरणार भारतातील नागरिकांच्या कसोटीचा काळ 

कोरोना संक्रमणकाळात वातावरणात झालेले बदल हृदयविकार असलेल्या नागरिकांसाठी धोकादायक !!   🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी 🔶🔷🔷🔶

सप्टेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतली असून  वाढत्या तापमानाने मुंबई व लगतच्या शहरातील नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होणार आहे.

भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पाहता हे भाकीत नक्कीच खरे ठरत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी धो धो कोसळत असलेल्या मान्सूनने मुंबई व लगतच्या शहरांमध्ये विश्रांती घेतली असून ऑक्टोबर महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मिशन बिगिन अगेनची सुरुवात केल्यानंतर अनेक नागरिक नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडत असून या नागरिकांच्या शरीरातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहे, एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे उन्हाचे चटके अशा दुहेरी संकटात मुंबईकर सापडला आहे. दोन दिवसापूर्वी ठाण्यामध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

खाजगी बसेस, बेस्ट व एसटी तसेच दुचाकी व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व मुख्यतः हृद्यविकार असलेल्या नागरिकांनी  याकाळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. याविषयी अधिक माहिती सांगताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” गेल्या काही दिवसांपासून , दिवसा कडक ऊन, संध्याकाळी हलका पाऊस पडत असून याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या बदलत्या वातावरणात हृदयविकार असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे कारण कोरोनाशी दोन हात करण्यामध्ये शहरातील आरोग्य यंत्रणा व्यस्त असून हृदयविकार असलेल्या अनेक नागरिकांची शल्यचिकीत्सा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या या कठीण प्रसंगी हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४० टक्के आहे. कोरोना विषाणूमुळे रक्तात होणारी गुठळी म्हणजेच रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो व अशा नागरिकांना हृदयविकाराचा झटका येतो ,म्हणूनच ज्या व्यक्तीना मधुमेह, रक्तदाब व इतर आजार असतील तर त्यांनी या वातावरणात अधिक काळजी घेतली पाहिजे.

वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेकांना चक्कर येणे, धाप लागणे, भोवळ येऊन पडणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे  कोरोना संक्रमणकाळात हे आजार अंगावर काढणे धोकादायक ठरू शकते. जगभरातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पाचपैकी एक रुग्ण हृदयाच्या समस्येमुळे मरण पावत असल्याचे आढळले आहे.

कारण कोरोना विषाणू हृदयावर आक्रमण करीत आहे असे संशोधनात आढळून आले आहे  कोरोना हा श्वसन विकार आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु अनेक केसेस मध्ये रुग्णांमध्ये सर्दी खोकला अशी लक्षणे आढळून येत नाहीत तर कोरोना हा हृदयाच्या रक्त वाहिनीवर सूज वाढवतो त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या हृदयाला रक्त पुरवठा करण्यात अडथळा येतो त्यामुळे अशा रुग्णांचा हृदयविकारामुळे मृत्यू होऊ शकतो “.

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, किडनी व हृदय संबंधी आजार असणाऱ्या लोकांचा समावेश अधिक आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नुकतीच दिली आहे. गेल्या सहा महिन्यात लॉकडाउन मुळे अनेक जेष्ठ नागरिकांना नैराश्य आले असून हायपरटेंशन तसेच मधुमेहात वाढ झाल्याची  माहिती एका अहवालामध्ये  दिसून आली आहे.

देशातले वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.