सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई 🔶🔷🔷🔶
आपल्या पोटच्या मुलीचा एक लाख वीस हजार रुपयांना व्यवहार करणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईत अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संबंधित मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या एका महिलेस सुमारे अठरा वर्षे वयाची तरुण मुलगी आहे. स्वतःच्या मुलीचा यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नसल्याचं सांगत ही महिला तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी ती ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना खबरी मार्फत मिळालेल्या माहितीनंतर बनावट ग्राहकामार्फत आरोपी महिलेसोबत बोलणं करण्यात आलं. तिने या बनावट ग्राहकाकडे यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. अखेर बोलणे झाल्यानंतर आरोपीने हा सौदा एक लाख वीस हजार रुपयांमध्ये ठरवला. पोलिसांच्या बनावट ग्राहकाने शिरवणे गाव (नेरुळ) येथील हॉटेल कोहिनूर पॅलेस येथे आरोपी महिलेच्या सांगण्यावरुन 1 रुम बुक केली.
सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला मीरा-भाईंदर येथून इंडिका कारने आपल्या मुलीसह हॉटेलमध्ये आली. या ठिकाणी आरोपी महिलेबरोबर बनावट ग्राहकाने बोलणं केलं. तसेच आईच्या सांगण्याप्रमाणे मुलीस घेऊन रुममध्ये गेला. रुममध्ये ही मुलगी वेश्यागमनासाठी अर्धनग्न होत होती. त्यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवरुन ठरल्याप्रमाणे इशारा केला. यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड आणि त्यांच्या पथकाने पंचासह छापा टाकला.
या कारवाईमध्ये पीडित मुलीची आई पोलिसांच्या सापळ्यात सापडली. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीची आई सोनम हाकीम सिंग (वय 40 वर्षे, मिरा रोड पूर्व) हिला अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित मुलीला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, प्रवीणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण (गुन्हे शाखा) आणि सहायक पोलीस आयुक्त अजय कदम (गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, सहायक पोलीस निरीक्षक सुनिता भोर, पोलीस हवालदार वायकर, कोकरे, कारखेले, पोलीस नाईक पाटील, पवार, धनगर यांचा समावेश होता.
Be First to Comment