Press "Enter" to skip to content

पेण शहरातील जवळपास 10 धोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटीसा जारी

  • येत्या दोन दिवसांत पुन्हा शहरात दवंडी पिटवणार — मुख्याधिकारी अर्चना दिवे 🔶🔷🔶🔷
  • महाडच्या कोसळलेल्या इमारतीमुळे अनेक नगरपालिकेना जाग 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 🌟💠🌟💠

रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिक गार्डन ही इमारत सोमवारी सायंकाळी कोसळल्यानंतर आता प्रत्तेक शहरातील धोकादायक, मुदतबाह्य तसेच अत्यंत धोकादायक इमारतींची माहिती बाहेर येत असून आता रायगड जिल्ह्यातील अनेक नगरपालिका प्रशासन जागे झाले आहेत.याबाबत पेण शहरात जवळपास 10 इमारती धोकादायक स्वरुपातील असून पालिकेने सदर इमारतींना अनेकदा नोटीसा जारी केलेल्या आहेत.

मात्र निद्रिस्त असणा-या इमारती मालकांनी या नोटिसांकडे कानाडोळा केला आहे त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा शहरात दवंडी पिटवणार असल्याची माहिती पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली आहे.

पेण शहरामध्ये पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्व्हे नुसार शहरातील 3 धोकादायक तर 7 अत्यंत धोकादायक इमारती आढळल्या असल्याची माहिती समोर आली आहे पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामाबाबत बेजबाबदारपणा हे गणित जुळालेले असतानाच शहरातील तरे आळी, दामगुडे आळी यासह बौध्दनगरचा काही भाग या तीन ठिकाणी धोकादायक इमारती, तर कुंभार आळी, फणस डोंगरी, भगवान महावीर मार्ग, झिराळ आळी, रामवाडी,दामगुडे आळी, विठ्ठल आळी या सात ठिकाणी अत्यंत धोकादायक इमारती असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हे नंतर उघड झाले आहे.

पालिकेने या इमारत धारकांना तशा प्रकारच्या नोटीसा देऊनही इमारत धारकांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा इमारत पुनर्बांधणीचा पालिकेमध्ये अर्ज केला नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सदर इमारतींची वेळीच पुनर्बांधणी करुन घेतल्यास महाड सारखा प्रसंग ओढावणार नाही.

 महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा येत्या दोन दिवसात शहरातील इमारती आणि घरे यांचा सर्व्हे करण्यात येणार असून ज्या इमारतींना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठविण्यात येणार आहेत. मात्र तरीसुद्धा त्यांनी नोटीसीला योग्य ते उत्तर दिले नाही तर कायद्यानुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच या व्यतिरिक्त इतर ज्या धोकादायक इमारती असतील त्यांना दुरुस्ती करण्याचे आणि पालिकेची परवानगी घेऊन पक्के बांधकाम करण्यासंदर्भात शहरामध्ये दवंडी पिटविण्यात येणार आहे.

अर्चना दिवे -- मुख्याधिकारी
पेण नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.