Press "Enter" to skip to content

वादळवाऱ्यामुळे ग्रामपंचायत घारापुरीचे अतोनात नुकसान

आर्थिक नुकसान भरपाई साठी सी एस आर फंडातून निधी देण्याची बळीराम ठाकूर यांची JNPT प्रशासनाकडे मागणी 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🌟💠🌟💠

ग्रामपंचायत घारापुरी कार्य क्षेत्रामध्ये 3 जून व 5 ऑगस्टच्या वादळी वाऱ्यामुळे एलिफंटा(घारापुरी)बेटावर मोठया प्रमाणात वित्तहानी झाली. तसेच कोरोना काळात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी CSR फंडातून JNPT प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पत्रव्यव्हाराद्वारे घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी JNPT चे अध्यक्षांकडे केली आहे.याबाबतचे निवेदन बळीराम ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार उरण, पंचायत समिती उरण यांनाही दिले आहेत.

घारापुरी(एलिफंटा)हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असून हे स्थळ चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेले बेट आहे. घारापुरी हे जागतिक कीर्तीच्या कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध असल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या कर वसुलीवर घारापुरी ग्रामपंचायतचा कारभार चालतो. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही मात्र 20 मार्च 2020 पासून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पर्यटक बंदीमुळे बेटावरील सर्व व्यवहार ठप्प असल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कोरोना काळात ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याने कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे शक्य होत नसल्याने तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत.

3 जून 2020 तसेच 5ऑगस्ट 2020 रोजी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे घारापुरी बेटावर ठिकठिकाणी मोठी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा, धर्मशाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर,ग्रामस्थांच्या घराची पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतबंदर,मोराबंदर, राजबंदर येथील समुद्राच्या लाटांमुळे संरक्षक भिंत, कठडा तुटल्याने रहदारीचा रस्ता, स्म्शानभूमीची संरक्षक भिंत वाहून गेली आहे.

घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असल्याने घारापुरी बेटाचे भयावह झालेले चित्र बदलणे गरजेचे आहे. मात्र सदर मोठया प्रमाणात झालेली वित्तहानी निधी अभावी ग्रामपंचायतीला भरून काढणे शक्य नाही खरे म्हणजे JNPT, NSICT(Dp world ), GTI बंदराच्या निर्मितीसाठी समुद्रात मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे व सदरच्या बंदरात येणाऱ्या महाकाय जहाजामुळे समुद्राच्या लाटांनी घारापुरी बेटाची तटबंदी उध्वस्त झालेली आहे. त्यामुळे घारापुरी किनाऱ्याची मोठया प्रमाणात धूप होऊन बेटाचे अतोनात नुकसान झाले आहे. चौथ्या बंदराच्या निर्मितीमुळे घारापुरी ते मोरा दळणवळण करण्यासाठी, ग्रामस्थांना येजा करण्यासाठी स्थानिक बोटींना जीवघेणा समुद्र प्रवास करावा लागत आहे. शिवाय घारापुरी येथील किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांचा रोजगारच बंद झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर घारापुरी बेटाला मोठया आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे या समस्यांची दखल घेत घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी NSIGT(DP world), GTI, चौथे बंदर यांच्याकडून घारापुरी ग्रामपंचायती करिता व बेटावरील समस्यांच्या निवारणाकरिता विविध कामाकरिता एकूण 46 लाख रुपये निधीची मागणी केली आहे. याबाबत बळीराम ठाकूर हे JNPT प्रशासन, खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार उरण, पंचायत समिती उरण यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.