सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
सन २०२०-२१ साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वाटप केले जाते. परंतु या पुरस्कारासाठी ज्याचा राजकीय वशिला दांडगा व ज्याच्या हाती सत्तेच्या चाव्या त्याच पक्षाच्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केले जात आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराला राजकीय कोरोना झाला असल्याची खमंग चर्चा शिक्षक वर्गात सुरू आहे.
दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक विभागात तालुक्यातुन दोन शिक्षकांची निवड केली जाते. जिल्ह्यातून होणाऱ्या निवडीच्या बहुमानासाठी कठोर परिश्रम, वर्तवणूक गुणवत्तापूर्व निकष करणे गरजेचे असते. जवळपास ७५ पानांची फाईल तयार असून ती पंचायत समितीत जमा करून पुढे जिल्हा परिषदेकडे पाठविली जाते.
यंदा तालुक्यातुन प्राथमिक विभागातील शिक्षकांनी आदर्श पुरस्कारासाठी निवड व्हावी यासाठी पंचायत समितीमध्ये दिलेल्या मुदतीत फाईल जमा करून तशा पोच ही घेतल्या आहेत. मात्र पंचायत समितीकडून फाईलची तपासणी अथवा शिक्षकांनी केलेल्या कार्याची कोणतीही दखल न घेता आपल्या मर्जीतील वशिलेबाजीची फाईल पुढे करण्यात राजकीय मंडळीने धन्यता मानली आहे.
मात्र या विरोधात कोणी शिक्षकांनी आवाज उठविल्यास त्यांची अत्यंत दुर्गम भागात बदली केली जात आहे. वशील्याने पुरस्कार मिळत असल्याने निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांवर एक प्रकारे अन्याय होत आहे. त्यामुळेच शिक्षक वर्ग काम न करता सत्ताधारी गटातील राजकीय नेतेमंडळींना हाताशी धरून काही शिक्षक आपला कार्यभाग साधून घेत आहेत.
यामुळेच विद्यार्थ्यांना मेहनत घेऊन शिकविण्यापेक्षा राजकीय वशिला वापरून आपला स्वार्थ साधत असल्याची चर्चा शिक्षक वर्ग दबक्या आवाजात करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. तरी अशा प्रकारे वशील्याने देण्यात येणारे पुरस्कार बंद करून कार्यक्षम शिक्षकांच्या कार्याची फाईल आल्यानंतर त्यांनी खरोखरच कार्य केले आहे, का फक्त कुठून तरी काम न करता पत्र घेऊन फाईल बनविली आहे. याची शहानिशा करूनच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावी अन्यथा आम्हाला या विरोधात दाद मागावी लागेल अशी मागणी शिक्षक वर्गाकडून जोर धरू लागली आहे.






Be First to Comment