भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔷🔶
भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी दलीत पँथर सुधागड तालुक्याच्या वतीने दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पाली पोलिस स्थानकात निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच तरडे यांचा जाहीर निषेध दर्शविण्यात आला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे. अशातच देशाच्या राष्ट्रीय व पवित्र ग्रंथाचा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अपमान केला आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात या कृत्याचा निषेध व्यक्त होत आहे. यावेळी दलित पँथर सुधागड तालुका अध्यक्ष नितीन यादव म्हणाले की भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क व अधिकार दिले आहेत. जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही म्हणून भारत देशाचा गौरव होतो. खडप्राय असलेल्या भारत देशाला कायम एकसंघ ठेवण्याची किमया संविधानात आहे. संविधान आमचा प्राण आहे, स्वाभिमान आहे.स्वातंत्र्य, समता , बंधुता व न्यायाचे प्रतीक असलेल्या संविधानाचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही.
कायम संविधानाचे संरक्षण व जतन करणे ही आमची कर्तव्ये जबाबदारी आहे. भारतीय संविधानावर मूर्ती प्रतिष्ठापना करून तरडे यांनी संविधानाचा अवमान केला आहे. त्यांच्या निंदनीय कृत्याने समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कृत्याचा दलित पँथरच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे यादव म्हणाले. यावेळी दलित पँथर सुधागड तालुका अध्यक्ष नितीन यादव ,सचीव अजित कांबळे,कार्याध्यक्ष कैलास कांबळे, पँथर कार्यकर्ते विष्णू वाघमारे, सहसचीव यश गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment