सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔷🔷🔶
तळोजा, सेक्टर-11 मधील मेट्रो पॉईंट इमारतीत राहणार्या रेखा हरिद्वार शर्मा (45) या महिलेची अज्ञात मारेकर्याने गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेखा शर्मा या आपल्या घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या.
या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. मृत रेखा शर्मा या तळोजा फेज-1 मधील मेट्रो पॉईर्ंट या इमारती पती आणि मुलासह राहण्यास होत्या. तसेच त्या कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. 24 ऑगस्ट रोजी सकाळी रेखा शर्मा यांचा पती आणि मुलगा दोघे कामानिमित्त बाहेर गेले असताना रेखा शर्मा या घरामध्ये एकट्याच होत्या. याचदरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात मारेकर्याने किचनमध्ये काम करत असलेल्या रेखा शर्मा यांचा गळा धारदार चाकुने चिरुन त्यांची हत्या करुन पलायन केले.
तळोजा फेज-2 मध्ये राहण्यास असणारी मृत रेखा शर्मा यांची विवाहित मुलगी मनिषा सियाली 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून त्यांना मोबाईलवर संपर्क करत होती. मात्र, रेखा शर्मा फोन उचलत नसल्याने मनिषा आपल्या वडीलांकडून असलेली डुप्लिकेट चावी घेऊन आईला बघण्यासाठी घरी गेली होती. यावेळी मनिषा हिने दरवाजा उघडल्यानंतर रेखा शर्मा घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिच्या निदर्शनास आले.
सदर घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेखा शर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकर्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.






Be First to Comment