Press "Enter" to skip to content

ओएनजीसीची पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात तेल गळती


गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भीषण आग तर यावेळीही तेल गळती 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔆🌟💠✳️

उरणमधील ओएनजीसी कंपनीची तेल पाईपलाईन मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली. सदर पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्यावर्षीही गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तेल गळती होऊन भीषण आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज पुन्हा गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तेल गळतीची घटना घडली आहे. ही वेळीच निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

काल सायंकाळी ५-६ च्या सुमारास पिरवाडी समुद्र किनारी असलेली पाईपलाईनमधून तेल गळती होण्यास सुरुवात झाली. सदर पाईपलाईन अडीचशे किलोमीटर दूरवर असणाऱ्या बॉंबे हाय येथून अरबी समुद्रामधून उरण ओएनजीसी कंपनीसाठी टाकण्यात आलेल्या टरबाईन लाईनमधून ही गळती झाली आहे.

आज सकाळी याठिकाणी ओएनजीसी प्रकल्पातील तज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून तेल गळती थांबविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान गेल्यावर्षी 3 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव काळातच ओएनजीसी प्रकल्पामधील न्यु एलपीजी 3 या ठिकाणी तेल गळतीमुळेच भीषण आग लागली होती.

या आगीमध्ये पाच कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका उच्च अधिकाऱ्यांचाही जीवही गेला होता. यामुळे वर्षभरातच पुन्हा झालेल्या तेल गळतीमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरची तेल गळती ही प्रेशर वाढल्याने झाल्याचे कंपनीतील अधिकारी वर्गाकडून सांगितले जात आहे. तेल गळती झालेली पाईपलाईन ही ५ ते १० फूट जमिनीखाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदर गळती झालेल्या पाईपलाईन पर्यंत पोहचण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. गळती झालेले तेल कोणते असल्याचे समजले नाही. मात्र हे तेल समुद्रात जाऊ नये यासाठी कंपनी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मात्र या तेलगळतीमुळे कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. मात्र वेळीच उपाययोजना केल्यामुळे गेल्यावर्षी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.