सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔷🔶🔷
तळोजा एमआयडीसी भागात डिझेलची चोरी करणा़र्या त्रिकुटाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. शिवराज कल्याण मुक्का (22), मनोज श्रीराम राठोड (26) आणि त्यांचा 17 वर्षीय अल्पवयीन साथीदार अशी या तिघांची नावे असून पोलिसांनी आरोपींकडून 350 लिटर डिझेल व चोरीसाठी वापरण्यात आलेली 3 चारचाकी वाहने जप्त केली आहेत.
या आरोपींनी तळोजा भागात केलेले चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी कोपरखैरणे भागात रहाण्यास असून ते तळोजा एमआयडीसी परिसरातील कंपन्यामध्ये बाहेरगावावरुन माल घेऊन येणा़र्या व कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेलची चोरी करत होते.
पहाटेच्या सुमारास ट्रक ड्रायव्हर झोपलेले असताना, हे त्रिकुट आपली वाहने घेऊन डिझेलची चोरी करत होते. डिझेल चोरीच्या घटनात वाढ झाल्याने तळोजा पोलिसांनी या डिझेल चोरांवर पाळत ठेवली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, निकम व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तळोजा एमआयडीसीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन तसेच तांत्रिक पुराव्याद्वारे आरोपींची माहिती काढली. त्यांनतर पोलिसांनी डिझेल चोरणा़र्या शिवराज मुक्का, मनोज राठोड व त्यांचा अल्पवयीन साथीदार या तिघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 350 लिटर डिझेल, त्याचप्रमाणे चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार,इनोव्हा कार आणि एक रिट्स कार असा सुमारे सव्वा 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली.
या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्यांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.
Be First to Comment