Press "Enter" to skip to content

आक्रस्ताळेपणा व भीती हृदयविकार वाढण्यास कारणीभूत – डॉ संजय तारळेकर

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / आरोग्य प्रतिनिधी #

कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटाने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला यापूर्वीच जागतिक महासाथ घोषित केले आहे. भारतात या संसर्गजन्य विषाणूचा प्रवेश आणि प्रसार चीन, इटली युरोप आणि अमेरिका यांच्या तुलनेत उशीरा आणि संथ झाला असला तरीही वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, भारतासारख्या १३७ कोटी इतक्या प्रचंड आणि अधिक घनतेच्या लोकसंख्या असलेल्या देशात, हा संसर्गजन्य रोग अनेक मानवी आपत्तीस कारणीभूत ठरू शकतो. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च ते जून महिन्यात सरकारतर्फे लॉकडाउन केले गेले. त्यामुळे लाखो नागरिकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली. भारतातील प्रत्येक नागरिकाला याची झळ बसली असून अनेक नागरिक निराशेच्या गर्तेत जाताना दिसत आहेत. परंतु जीवनात नेहमीच आशावादी राहिले पाहिजे अशी महाराष्ट्रातील थोर संताची आपल्याला शिकवण आहे. म्हणूनच या संकटकाळात प्रत्येक नागरिकांने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कालच एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीवर एका चर्चेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचे हृद्यविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.काल संध्याकाळी एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला. दिवसभर त्यांची तब्येत ठीक होती. त्यांच्या तब्येतीबाबत कोणतीही तक्रार नव्हती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन कोसळले. या घटनेचे विश्लेषण करताना शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर सांगतात, ” हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी तणाव नियोजनाचे महत्व लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. कोरोना संकटात लॉकडाउनमुळे क्रिया शून्यता म्हणजेच शरीराची हालचाल मंदावली आहे. त्यामुळे वजन वाढले आहे तसेच चुकीच्या आहारपद्धतीमुळे उच्च रक्तदाब व मधुमेह वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच निदान कोरोनाचे संकट जाईपर्यंत चिडचिडेपणा, घरातल्या व्यक्तींवर रागावणे, उदासीनतेची भावना वाढविणे , भविष्यात काय होणार याची चिंता करणे कमी झोप घेणे, अनावश्यकरीत्या आक्रमक होणे म्हणजेच आक्रस्ताळेपणा करणे यापासून दूर राहणे महत्वाचे आहे.

कोरोनाच्या आधीही अनेक नागरिक तणावग्रस्त होते परंतु हिंडण्या-फिरण्याची बंधने नसल्यामुळे आपल्या मित्रांशी अथवा नातेवाईकांशी भेटून व बोलून काही प्रमाणात का होईना हा तणाव दूर होत होता. परंतु कोरोना संकटात आपण सर्वजण एकाच ठिकाणी अडकलो आहोत म्हणूनच आपले मानसिक स्वास्थ जपणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक तणाव एका पातळीनंतर पुढे गेल्यावर तळहातांना घाम येणे, तोंड कोरडे पडणे, अनियमित श्वासोच्छवास होणे, स्नायू ताणले जाणे, मांसपेशी, हात-पाय थंड पडणे, पोटात गोळा उठणे, थरथर वाटणे, वारंवार लघवी होणे, हातापायांची जलद जलद हालचाल करणे अशी लक्षणे आढळतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

कोरोनाचे संकट हे काही दिवसापुरते आहे ही भावना प्रत्येक नागरिकाने जोपासली पाहिजे तसेच मानसिक तणाव आल्यावर मोबाईल अथवा टीव्हीवर विनोदी चित्रपट पाहणे आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी फोनवर बोलणे, कुटुंबीयांसोबत हास्य विनोद करणे ही काळाची गरज आहे “.

हृदयविकार असणाऱ्या रूग्णांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका हा सर्वाधिक असतो. या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्गाची लागण होऊ शकते. परंतु, भितीमुळे अनेक रूग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास टाळाटाळ करतात. वेळीच शस्त्रक्रिया न झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अत्यंत गरज असल्यास हृदयावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. कोविड-१९ प्रोटोकॉल नुसार योग्य ती काळजी घेऊन ओपन हार्टसर्जरी सुरक्षितपणे करता येऊ शकते असा सल्ला शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर यांनी सिटी बेल लाइव्ह शी बोलताना दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.