“ते” पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत ###
महाविकास आघाडीतील बिघाड दुर ###
सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
राज्यात एकत्रित सत्तेत असताना राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक पळविले या बातमीची गेल्या चार दिवसापासून मोठी चर्चा होती या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही अशा बातम्या रंगू लागल्या होत्या अखेर या वादावर आज पडदा पडला पारनेर नगरपंचायतीचे हे पाचही नगरसेवक अखेर पुन्हा शिवसेनेत परतले आणि आम्ही करून दाखवले हे वाक्य शिवसेना नेत्यांनी पुन्हा सिद्ध केले.
‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पारनेर च्या या पाच नगरसेवकांची बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीतही बैठक पार पडली.
बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमताई बोरुडे, स्वीकृत नगरसेवक विजय वाघमारे, विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे यांचीही उपस्थिती होती. नार्वेकर, आ. लंके व नगरसेवक यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.
आघाडी सरकारवर परिणाम नको म्हणून पुन्हा शिवसेनेत परतण्यावर सर्वांचे एकमत करण्यासाठी आ. नीलेश लंके यांची यशस्वी शिष्टाई तर मिलिंद नार्वेकरांच्या मुत्सद्देगिरीला यश मिळाले आहे.
शिवसेना महिला तालुकाप्रमुख उमाताई बोरूडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गेल्या शनिवारी (दि. 4) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता.
शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांना परत द्या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीदेखील यादरम्यान मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगली होती. आज माञ राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे पाच नगरसेवक आता स्वगृही परतल्याने महाविकास आघाडी भक्कम आहे असा संदेश दिला गेला.
Be First to Comment