Press "Enter" to skip to content

‘रोहयो’ कायद्याची पोलादपूर पं.स.व तहसिलकडून हेळसांड

‘लोकसेवा’चे अध्यक्ष नलावडे करणार स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

परावृत्त करण्यासाठी सोमवारी विशेष बैठक – तहसिलदार घोरपडे

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

रोजगार हमी योजना कायद्यानुसार जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात पोलादपूर पंचायत समिती आणि पोलादपूर तहसिल कार्यालयामार्फत अक्षम्य हेळसांड होत असल्याने येथील लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांनी आत्मदहन करून पंचायत समितीच्या इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा शुक्रवारी दिल्यानंतर पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी सोमवारी आत्मदहनाच्या प्रयत्नापासून नलावडे यांना परावृत्त करण्यासाठी दि.14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

पोलादपूर तालुक्यात पंचायत समिती पोलादपूर मार्फत रोजगार हमी योजनेची कायद्यानुसार अंमलबजावणी होत नसून तालुक्यात बेकायदेशीररित्या वीटभट्टी तसेच वाळूउत्खनन व्यवसाय प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याने माहितीचा अधिकार कार्यकर्ता विश्वास नलावडे यांनी पोलादपूर पंचायत समिती तसेच पोलादपूर तहसिल कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. या कागदपत्रांवरून विनापरवाना वीटभट्टया व वाळूउपसा व्यावसायिकांकडून काही प्रमाणात महसूल वसुली केली जात असल्याचे उघड झाले असूनही पोलादपूर तहसिल कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी संबंधितांविरूध्द कारवाई करण्याऐवजी विश्वास नलावडे यांनाच हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने याबाबतची अदखलपात्र तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. पोलादपूर पंचायत समितीने देखील रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना रोहयो कायद्याने रोजगाराची हमी देऊनही रोजगार न मिळाल्याच्या काळातील भत्ता देण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केलेली असल्याचा पाठपुरावा विश्वास नलावडे यांनी वेळोवेळी माहितीच्या अधिकार कायद्यान्वये केला आहे.

पोलादपूर तहसिल कार्यालयामार्फत बेकायदेशीर धंदे कर्मचाऱ्यांमार्फत चालविले जात असल्याचा आरोप करीत विश्वास नलावडे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कायद्याचीही पंचायत समितीमार्फत योग्य तऱ्हेने अंमलबजावणी केली जात नाही, अशी वस्तुस्थिती कथन करताना न्यायालयीन लढाईसाठी आपण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याचा खेद व्यक्त करीत या परिस्थितीत आत्मदहन करून पंचायत समितीच्या इमारतीवरून उडी मारल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत मरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या हक्काच्या रोजगार भत्त्याच्या रक्कमेचे थेट बँकेच्या खात्यात वाटप करणे प्रशासनाला भाग पडेल, असा विश्वासही नलावडे यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी विशेष बैठक – तहसिलदार घोरपडे

दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांनी आत्मदहन करून पंचायत समितीच्या इमारतीवरून उडी घेण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभुमीवर पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक तसेच विश्वास नलावडे यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी सोमवार, दि.14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता विशेष बैठकीचे आयोजन केल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीस दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.