हळदी समारंभात पोलीस उपनिरीक्षकाचा धिंगाणा
सिटी बेल ∆ पनवेल ∆
मध्यरात्री अडीच वाजता हळदी समारंभात नाच गाणे सुरू असताना डीजे बंद केल्याचा राग आल्याने एका मस्तवाल पोलीस उपनिरीक्षकाने चक्क भावाला आणि गावकऱ्यांना मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री अडीच वाजता हळदी समारंभात नाचगाणे सुरू होते परंतु उशीर झाल्याने येथील डीजे बंद करण्यात आला. त्याचाच राग आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने भावालाच मारहाण सुरू केली. स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचा धाक या पोलीस अधिकाऱ्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांना दाखवल्याने वैतागलेल्या गावकऱ्यांनी अखेर खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पनवेल तालुक्यातील नेवाळी गावातील जयेश पाटील यांच्या घरासमोर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देवनाथ कथारा यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
देवनाथ यांनी मध्यरात्री झाल्याने डीजे बंद केला त्यामुळे रोशन यांना नाच करता आला नाही. याचा राग मनात धरून त्याने मी पोलीस अधिकारी आहे असे जमलेल्या गावकऱ्यांना बजावले तसेच यावेळी रोशन यांनी देवनाथ व लक्ष्मण यांना मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सुभाष गडगे याला देखील रोशन याने मारहाण केली.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे पोलिसांना शिस्त लागावी यासाठी विविध प्रयोग पोलीस दलात करत आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना रोशन काथारा यांच्या सारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी सपशेल हरताळ फासलेला दिसून येत आहे. आज पर्यंत सामान्य नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या तीन पोलिसांविरोधात विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली आहे. आता रोशन काथारा यांच्या विरोधात आयुक्त काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Be First to Comment