Press "Enter" to skip to content

शरद बुटाला यांचा 81 वा वाढदिवस साजरा

पोलादपूर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शुभचिंतन

ज्येष्ठ नागरिकांनाही पेन्शन द्या – कांचन बुटाला

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

तालुक्यातील ख्यातनाम उद्योजक व समाजसेवक तसेच स्वामीसमर्थ सेवक शरद महादेव बुटाला यांचा 81 वा वाढदिवस पोलादपूर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूषांनी शुभचिंतन करताना सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बुटाला आणि शरदभाई यांच्या योगदानाबद्दल स्नेहभाव प्रदर्शित केला.

प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा कांचनताई बुटाला यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूषांनी ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वाहिली.

यावेळी लेप्रसी मिशन हॉस्पिटलमधील बी.डी.मंडले मास्तरांनी इश्वर आणि मानवातील संवादात मानवाने त्याचे आयुष्य किती, असा सवाल केल्यानंतर इश्वराने 70किंवा 80 सांगितले असताना आज शरदभाईंनी 81 व्या वर्षात पदार्पण केल्याचे कौतुकास्पद असल्याचे सांगून 1958 पासून कांचनताई आणि शरदभाई यांच्या कुटूंबियांसोबत संबंधित असल्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुरेंद्र दा.जाधव यांनीही, शरदभाईंनी वडीलांप्रमाणे कोणतीही चीजवस्तू घेऊन आलेल्या गरजू व्यक्तीस ॠण देण्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे सांगितले. यावेळी कशेडी येथील श्रीस्वामी समर्थ मठातर्फे यावेळी स्वामीसेवक शरदभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एलआयसीचे सल्लागार चंद्रकांत घाडगे यांनी कांचनताई आणि शरदभाई यांच्यातील देवभाव सात्विकता महत्वाची असल्याचे सांगून ‘आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे…’ अशी प्रार्थना देवाकडे केली.

यावेळी कांचनताई बुटाला यांच्यासह प्रसन्न बुटाला आणि अथर्व बुटाला यांनी शरदभाई बुटाला यांना 81 दिव्यांनी ओवाळून वाढदिवसाचे शुभचिंतन केले. यावेळी कांचनताई बुटाला यांनी ज्येष्ठ नागरिकांना शासनाने पेन्शन देण्याची मागणी करीत सन्मानाने जगण्यासाठी केवळ सेवानिवृत्त आणि दिव्यांगांनाच आवश्यकता नसून ज्येष्ठांनाही स्वाभिमानाचे जगण्याची तरतूद राज्यसरकारने करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. यासाठी कांचन बुटाला यांनी आ.प्रवीण दरेकर यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.