सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, कुलाबा जिल्ह्याच्यावतीने कर्जत नगरपरिषदेच्या स्वच्छता दूतांचा भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान करण्यात आला.
कर्जत नगरपरिषद सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याला जनकल्याण समितीचे संभाग कार्यवाह अविनाश धाट, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर,आरोग्य अधिकारी सुदाम म्हसे, समितीचे विभाग कार्यवाह रविकिरण काळे, नगरसेवक, नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी होत्या.

भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी समितीच्या जिल्ह्यातील कामांची माहिती प्रास्ताविकात दिली. त्यानंतर कर्जत नगरपालिकेला स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तसेच अन्य पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अविनाश धाट यांनी जनकल्याण समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांनी कर्जत नगर परिषदेला मिळालेल्या पुरस्कारामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनीही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि यापुढेही कर्जत शहर स्वच्छ राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक काम करण्याचे आवाहन केले.सुदाम म्हसे यांनीही याप्रसंगी आपल्या विचार व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित स्वच्छता दूतांना जनकल्याण समितीच्या वतीने भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन रवींद्र लाड यांनी केले शेवटी नितीन भावे यांनी आभार मानले. याप्रसंगी समितीचे निधी प्रमुख संजीव दातार, भाऊ पोंडेकर,संघाचे तालुका कार्यवाह संतोष देशमुख, विहिंपचे विशाल जोशी, साईनाथ श्रीखंडे ,श्रीकांत ओक,भगवान भगत, वनवासी कल्याण आश्रमाचे योगेश चोळकर, महेश निघोजकर, मिलिंद खंडागळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment