नागोठणे येथे अवैध धंद्याना वरदहस्त कोणाचा ? : हरिचंद्र तेलंगे
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकुब सय्यद ∆
मुंबई-गोवा राष्ट्रीय 66 क्रमांक महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण नागोठणे गावाला अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे.
चरस,गांजा मटका व चक्री मटका चिमणी पाखरं गुटखा विक्रेते यांसारखे अनेक अवैध धंदे बिनदिक्कत सुरू असल्याने त्यात तरुण पिढी बरबाद होताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारी देखील वाढली असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी मनसेनेचे माजी तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे यांनी शासकीय विश्रामगृह नागोठणे येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये बोलताना सांगितले.
नागोठणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा विक्री,मटका जुगार , अवैध पान मसाला ,गुटखा विक्री बेकायदेशीर सुरू आहे. नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या असून या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय लोकांची वस्ती वाढली आहे.बाहेरून येणाऱ्या लोकांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याने नागोठणे गावात अवैध धंदे वाढले आहेत.त्याचा फटका स्थानिक तरुणांना बसत असून स्थानिक तरुण वाम मार्गाला जात आहे असे ही तेलंगे यांनी म्हटले आहे.
अवैध धंद्याबाबत पोलिसांकडे तक्रार करून देखील या गंभीर बाबीकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. काही दिवसांपूर्वी नागोठणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली होती. त्यानंतर सर्व कारवाई थंड पडली असून अवैध धंद्याला उत आला आहे.गांजा माफियांनवर कोणत्याही प्रकारे जरब बसलेली दिसत नाही असे ही तेलंगे म्हणाले.
याबाबत तेलंगे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अवैध धंद्यांवर कारवाई करून तरुण पिढीला वाममार्गाला जाण्यापासून वाचवावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत मनसेनेचे रोहा तालुका सरचिटणीस साईनाथ धुळे, मनसेना महिला तालुका अध्यक्ष दीपाश्री घासे, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे, माथाडी कामगार प्रमुख विनायक तेलंगे गोरखनाथ पारंगे उप तालुकाध्यक्ष नम्रता भिसे माजी. उपतालुका अध्यक्ष रसिका तेलंगे वांगणी ग्रामपंचायत सदस्य अर्चना तेलंगे महाराष्ट्र सैनिक शितल कदम महाराष्ट्र सैनिक त्याचबरोबर व मनसेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment