सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत सायकल प्रेमी तर्फे श्रीनगर ते लेह-लडाख अशी अतिउंचीवरील सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलस्वारांचा कर्जत नगरपरिषद तर्फे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीनगर (जम्मू काश्मीर राज्य) ते लेह लडाख अशा अतिउंचीवरील प्रदेशात 445 किलोमीटर सायकल चालवून ही मोहीम पूर्ण केली. या मोहिमेचा त्यांचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वरून होता,या सायकल मोहिमेत अतिउंचीवरील विरळ हवामानात 10 हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, असे जोझिला पास 11 हजार 557 फूट, नमीकला पास 12 हजार 139 फूट, फोटूला पास 13 हजार 479 फूट हे 3 पॉईंट्स पाऊस पडत असताना बोचऱ्या थंडीत व काही वेळेस रणरणत्या उन्हात 37 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पार केले.
या सायकलस्वारांनी द्रास आणि कारगिल येथे असलेल्या कारगिल वॉर मेमोरियललाही भेट दिली व 1999 मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना मानवंदना दिली. या मोहिमेत 7 सायकलस्वार सहभागी झाले होते व मदतनीस म्हणून 3 सदस्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.
सायकलस्वारांमध्ये सायकल मोहिमेचे पथकप्रमुख प्रकाश पटवर्धन, श्रीराम फाटक, हितेन राणे, किशोर साळवी, अमित मोने, श्रीरंग जोशी व अमित गुरव सहभागी झाले होते, तर मदतनीस व छायाचित्रकार म्हणून विशाल गायकवाड, भावेश ठक्कर व गौरव फाटक यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली . याचबरोबर लेह येथील जगातील सर्वात उंच रस्ता म्हणजेच खारदुंगला पास 18 हजार 380 फूट या ठिकाणी सायकल मोहिमेतील श्रीरंग जोशी व किशोर साळवी हे सायकलस्वार अतिशय खडतर वातावरणात येथे सायकलवर पोहोचण्यात यशस्वी झाले व त्यांनी तेथे भारतीय तिरंगा ध्वज फडकवला.
या सायकलस्वारांचा कर्जत नगरपरिषदेतर्फे सन्मान आयोजित करण्यात आला होता, सायकलस्वारांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाश पटवर्धन यांना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी नगरसेविका वैशाली मोरे, संचिता पाटील विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, भारती पालकर नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, शिवशंभो चे विकास चित्ते, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, सुदाम म्हसे उपस्थित होते.








Be First to Comment