Press "Enter" to skip to content

रस्त्याअभावी आजारी आदिवासी बांधव व मृतदेहांना डोलीचा आधार

शासनाच्या गाव तिथे रस्ता व वाडी तिथे रस्ता योजनेचा कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत बोजवारा

मंजुरीनंतरही कोंडगाव आदिवासी वाड्यांकडे जाणारा रस्ता अपूर्ण : आदिवासींची पायपीट सुरूच

रस्त्यामधील अडथळे दूर करण्याच्या स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास रोहा तहसीलदार असमर्थ

सिटी बेल ∆ नागोठणे  ∆ महेश पवार ∆

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सर्वत्र नुकतेच उत्साहात साजरे करण्यात आले. असे असतांनाच काही गावे, आदिवासी वाड्या व ग्रामीण भागातील जनतेला आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मुलभूत सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे. नागोठणे विभागातील कोंडगाव(ता.रोहा) ग्रामपंचायत हद्दीतील चार  आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनाही याच यातना भोगाव्या लागत आहेत.  या आदिवासी वाड्यांकडे जाणारा रस्ता मंजुरीनंतरही अपूर्ण असल्याने येथील आदिवासी बांधवांची पायपीट सुरूच आहे. तर रस्ता नसल्याने साधे दुचाकी वाहनही या वाड्यांवर पोहचू शकत नसल्याने सुमारे १४०० लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वाड्यांतील आजारी आदिवासी बांधव व मृतदेहांना आजही डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगाव, एकळघर ते भपक्याची वाडी आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्याला आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या अर्थसहाय्याने व रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या आदेशाने सुमारे ७५ लाख रूपयांची मंजुरी मिळाली. नंतर एकलघर ते भपक्याची वाडी या रस्त्याचे खडीकरणही दोन टप्प्यात करण्यात आले.  उर्वरित कोंडगाव गावदेवी मंदिर ते डावशेत-एकलघर या टप्प्यासाठी रु. २५.७८ लाख एवढ्या रकमेची मंजुरी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दि. २८/२/२०१८ च्या आदेशान्वये मिळाली आहे. असे असतांनाच येथील काही शेतकऱ्यांनी विविध कारणाखाली हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम सुरूच होऊ शकले नाही. रस्त्याच्या कामात न्याय मिळण्यासाठी हा विषय आदिवासी बांधवांकडून रोहा तहसीलदार यांच्या न्यायालयात नेण्यात आला. तेथे मामलतदार कोर्ट अॅक्ट १९०५ चे कलम ५ अंतर्गत कामकाज चालविण्यात आले. याचदरम्यान रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्याकडून दोनवेळा स्थळपाहणीही करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी चार वेळा घेण्यात आलेल्या सुनावणीत अर्जदार आदिवासी बांधव तसेच सामनेवाले शेतकरी यांचे लेखी व तोंडी म्हणणेही घेण्यात आले.

कोंडगाव आदिवासी वाड्यांकडे जाणारा अरुंद रस्ता दाखविताना ग्रामस्थ व डोलीतून मृतदेह नेताना आदिवासी बांधव

त्यानंतर रोहे तहसीलदार यांनी कोंडगाव ते कातळावाडी, एकलघर, पायरावाडी व भपक्याची वाडी या रस्त्यामध्ये निर्माण झालेला अडथळा संबधितांनी तत्काळ दूर करावा तसेच अर्जदार यांनी इतर क्षेत्राला कोणतीही बाधा न पोचविता उपवनसंरक्षक अलिबाग यांचेकडील आदेश दि. ०१/०२/२०२१ अन्वये रस्त्याकरिता हस्तांतरण केलेल्या क्षेत्रातून वहिवाट करावी असे आदेश २८ मार्च, २०२२ रोजी दिले आहेत. असे असतांनाच ज्यांनी हे आदेश दिलेत त्या रोहा तहसीलदारच या आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरत असल्याने आदिवासी बांधवांनी रोहा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा माध्यमांशी बोलतांना दिला आहे. यावेळी कोंडगावच्या सरपंच कमळ बुरुमकर, उपसरपंच अनंत वाघ, सदस्य निखिल मढवी, गोविंद हंबीर, मोरु भस्मा, काशिनाथ सिद, यशवंत सिद,  रावजी भस्मा, सोन्या हंबीर, रामजी हंबीर, खुमा हंबीर, हरी हंबीर, यशवंत भस्मा, लिंबाजी भस्मा, ज्ञानेश्वर मालुसरे, जानू बंगारा, सुनिल बरतड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान कोंडगाव ते भपक्याची वाडी या मार्गातील नदीवर आवश्यक असलेले तीन साकव यापूर्वीच तयार झाले आहेत. तसेच सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्ताचे खडीकरणही झाले आहे. असे असतांनाच कोंडगाव गावापासून सुमारे ६०० मीटरच्या अंतरातील रस्त्याचे काम खासगी जागा मालकांनी आणलेल्या अडथळ्यामुळे थांबले असून तहसिलदाराच्या या आदेशाला खासगी जागा मालकांनी रोहा येथील दिवाणी न्यायालयात आव्हान दिल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी रोहा तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे सर्व आदिवासी बांधवांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.