सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर जिल्हा परिषद शाळा झाली तब्बल 145 वर्षांची…!

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
तब्बल तीन पेक्षा अधिक पिढ्यांना ज्या शाळेने घडविले. ज्या शाळेने पारतंत्र्यात व स्वातंत्र्यात देखील ज्ञानदानाचे काम अखंड सुरू ठेवले. अशा सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेला गुरुवारी (दि.6) तब्बल 145 वर्षे पूर्ण झाली. शाळेच्या 145 व्या वाढदिवशी म्हणजेच वर्धापन दिनाला सगळ्या आजी आणि माजी विध्यार्थ्यांनी शाळेतील सुवर्ण आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक दशके या शाळेने पाहिले, अनेक विद्यार्थी घडविले, त्यामुळे या शाळेला विशेष महत्व आहे.
मागील काही वर्षांपासून शाळेचे माजी विद्यार्थी शाळेचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमूळे प्रत्येकाने फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेचा वाढदिवस साजरा केला. सिद्धेश्वर गावचे सरपंच व माजी विद्यार्थी उमेश यादव यांनी सांगितले की सिद्धेश्वर गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील तीन पिढया या शाळेने घडवल्या आहेत. आम्ही सदैव शाळेचे व शिक्षकांचे ऋणी राहू. तसेच ज्या माजी विध्यार्थ्यांनी शाळेचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि हा कार्यक्रम सुरू करून तो अविरतपणे पुढे चालू ठेवला त्या सर्व कमिटी सदस्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा सरपंच उमेश यादव यांनी दिल्या.
तर शाळेचे माजी विद्यार्थी निलेश शिर्के यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आई नंतर जर कोणी आपल्यावर संस्कार व प्रेम केले असेल तर ती आपली शाळा सिद्धेश्वर, या शाळेने जगायला शिकविले. आज तुझा वाढदिवस, तुला शुभेच्छा देण्याएवढा जरी मोठा झालो नसलो तरी तुझे ऋृण कधीच न विसरता येणारे असे शिर्के यांनी सांगितले. शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करत असून त्यांनी वर्धापन दिनानिमित्त आजीमाजी शिक्षक व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment