रानबाजिरे धरणाच्या पाण्यावर तिरंगी प्रकाशझोताचा मनमोहक नजारा
सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆
महाड आणि पोलादपूर तालुक्यात सावित्री नदीच्या महापूराला यंदा ज्या रानबाजिरे धरणाने नियंत्रणामध्ये ठेवले ते रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे धरण यंदाच्या पावसाळयामध्ये पुन्हा चर्चेत आले असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या धरणाच्या पाण्याच्या विसर्गावर तिरंगी प्रकाशझोत सोडण्यात आल्याने या धरणाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा पावसाळयापूर्वी रिकामा केल्यास अतिवृष्टीकाळामध्ये हा बॅकवॉटरचा साठा भरून येईल आणि तातडीने होणाऱ्या विसर्गामुळे सावित्री नदीपात्रालगत दूतर्फा होणारी पूरस्थिती टळेल, अशी सूचना प्रस्तुत प्रतिनिधीने महाड पूरनिवारण समितीमध्ये केल्यानुसार त्यावर तातडीने कार्यवाही होऊन या धरणातील पाणी सोडण्यात आले. यामुळे यंदा महाड शहरामध्ये पूरस्थिती नियंत्रणामध्ये राहण्यात या रानबाजिरे धरणाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. यामुळे रानबाजिरे धरण यंदाच्या पावसाळयात पहिल्यांदा चर्चेत आले होते.
अशातच, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाड एमआयडीसीकडून या धरणाच्या विसर्गाच्या जलौघावर हिरवा, सफेद आणि नारंगी रंगाचे प्रकाशझोत सोडण्यात आल्याने 13 ऑगस्ट 2022 पासून या धरणाचे रात्रीचे दृश्य अतिशय नयनरम्य दिसून येत असल्याने हौशी नागरिकांची गर्दी रात्री देखील धरणपरिसरामध्ये मोटारसायकल व अन्य वाहनांतून फिरण्यास तसेच फोटो सेल्फी आणि व्हिडीओ काढण्यासाठी जमू लागली. रातोरात या रानबाजिरे धरणाचे व्हिडीओ व्हॉटसऍप स्टेटस, युटयूब आणि फेसबुक तसेच अन्य सोशल मिडीयावरून प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्याने रातोरात रानबाजिरे धरण पुन्हा चर्चेत आले.
शनिवारी संध्याकाळी व रात्री धरणपरिसरात फिरण्याची संधी हुकलेल्या हौशी नागरिकांनी आवर्जून धरणासोबत स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ काढण्याचे बेत आखले असून पोलादपूर तालुक्यासोबतच महाड, माणगाव आणि अन्य भागातील हौशी नागरिकांनी आपआपल्या दोस्तमंडळी व नातेवाईकांना याबाबत विचारणा केली आहे.








Be First to Comment