
सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
माथेरान मधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सुंदर आणि गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या सन १९०३ या स्वातंत्र्य पूर्वकाळातील हेरिटेज दर्जा प्राप्त असणाऱ्या पोस्ट कार्यालयाचे आणि वास्तूचे लवकरच नूतनीकरण( दुरुस्ती ) करावी जेणेकरून हा ब्रिटिशकालीन ठेवा भावीपिढीला याचा काहीशा प्रमाणात लाभ घेता येईल अशी मागणी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी पोस्ट खात्याचे प्रवर अधीक्षक पनवेल विभाग(नवी मुंबई ) यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आजही ही पोस्टाची सुंदर इमारत मोठया दिमाखात ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे परंतु या इमारतीच्या सभोवताली तसेच दर्शनी भाग सुध्दा पुर्णतः मोडकळीस आलेला असून संबंधित कर्मचारी यांच्या खोल्या तसेच या कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वास्तू वादळी वाऱ्याने मोडून पडलेल्या आहेत. तर कार्यालयातील जुने लाकडी खांब सुध्दा अतिवृष्टीमुळे केव्हा कोसळून पडतील याचा नेम नाही यामुळे वेळप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी अथवा येणाऱ्या ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सध्यातरी कार्यालयात मुख्य अधिकारी उपस्थित नसले तरी ज्या व्यक्ती या कार्यालयाची सध्या देखभाल करीत आहेत ते सुद्धा आपला जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत असतात.नुकताच हेरिटेज कमिटीने सदर वास्तूच्या दुरुस्ती साठी परवानगी दिलेली असताना अद्याप याबाबत काहीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे लवकरच या हेरिटेज वास्तूच्या दुरुस्ती साठी प्रयत्न करावेत असेही विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदेंनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी वर्ग काय भूमिका बजावतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.






Be First to Comment