कोरोनातही पाटनोलीत हरिनाम सप्ताहाची अखंडित परंपरा जतन
सात दिवस गर्दी विरहित हरिनामाचा जागर

सिटी बेल लाइव्ह / पनवेल /प्रतिनिधी #
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पाटनोली गावात श्रावण महिन्यामध्ये हरिनाम सप्ताह संपन्न होतो. दरवर्षी भव्य दिव्य स्वरुपात असलेला हा जागर यंदा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येत आहे. कोरोना या महामारी रोगामुळे गर्दी विरहित हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे . फक्त चार ते पाच जणच यामध्ये सहभागी होऊन हरी नामाचा जप करीत आहेत. या माध्यमातून पाटनोली ग्रामस्थ मंडळाने कोरोना संक्रमण होणार नाही याची खबरदारी घेऊन आध्यात्मिकतेची अखंडित परंपरा सुरू ठेवले आहे. या माध्यमातून त्यांनी गावासमोर वस्तुपाठ ठेवला आहे.
पाटनोली येथील दत्त मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात पार पडणारा हरिनाम सप्ताहाला धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने भजन, कीर्तन ,प्रवचन त्याचबरोबर दररोज महाप्रसाद असा भव्य दिव्य स्वरुपात कार्यक्रम केला जातो. पंचक्रोशीत श्रावण महिन्यातील हा हरिनाम सप्ताह प्रसिद्ध आहे. परंतु यंदा कोरोना या वैश्विक महामारी रोगामुळे अनेक सण उत्सव कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे संक्रमण होऊन न देता गावातील हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थ मंडळ आणि पंच कमिटीने पुढाकार घेतला.
त्यानुसार कोणतीही गर्दी न करता केवळ चार ते पाच ग्रामस्थ सामाजिक अंतराने, तसेच सर्व नियम व अटींचे पालन करून हा सप्ताह साजरा करतील असा निर्णय घेण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सहमती दर्शवत गावातील अध्यात्मिक अधिष्ठान असलेला सप्ताह अखंडित रहावा यासाठी सहकार्य केले. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी या सप्ताहाची ह. भ. प महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते विना पूजन करून सुरुवात झाली.
यावेळी श्रावण रामा पाटील, भीम राम पाटील, मृदंगमणी तुकाराम रामा पाटील उपस्थित होते. दरवर्षाप्रमाणे सर्व कार्यक्रम रद्द करून सायंकाळी चार ते पाच जण संगीत भजन करून हरिनामाचा जागर करीत आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी ग्रामस्थ मंडळ पाटनोली आणि पंचकमिटी परिश्रम घेत आहे.






Be First to Comment