माणगाव व म्हसळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत #
रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टी चा इशारा दिला असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंबा, सावित्री, कुंडलिका, काळ उल्हास अशा महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. छोटे नदी, नाले व तलाव ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी (ता.5) माणगाव येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अशितोष कुचेकर (वय19) तरुणाचा मृत्यू झाला असून गुरुवारी (दि.6) त्याचा मृतदेह सापडला. तर म्हसळा येथे पाभरे येथील नदीत सायंकाळी पोहण्यासाठी गेलेला बदर अब्दुल्ला हळदे (वय 23) हा तरुण बुडाला असून त्याचा मृतदेह अजून सापडेला नाही.
दरम्यान पेणमध्ये एन डी आर एफ चे पथक दाखल झाले असल्याची माहिती मिळते, तर अनेक ठिकाणी स्थानिक शोध पथकाच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सध्या महाड येथे इंडियन कोस्ट गार्ड, मुरूड व पेण येथे NDRF,पुणे या दोन टीम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोणीही घराबाहेर निघू नये व पोहण्यासाठी देखील जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.






Be First to Comment